लॉस अँजेलस : ज्येष्ठ अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडोर्मंड यांना चित्रपट विश्वातील अत्यंत मानाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला. मात्र अवघ्या बारा तासांतच त्यांच्या आनंदावर विरजण पडलं. याचं कारण म्हणजे त्यांची ऑस्कर पुरस्काराची बाहुली चोरीला गेली. चोरीप्रकरणी पोलिसांनी 47 वर्षीय व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत.


'थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी' चित्रपटातील भूमिकेसाठी  फ्रान्सेस मॅकडोर्मंड ऑस्कर देऊन गौरवण्यात आलं. मात्र द गव्हर्नर्स बॉल पार्टीमध्ये फ्रान्सेस यांचा ऑस्कर पुरस्कार चोरीला गेला. चोरीनंतर फ्रान्सेस यांचं अवसानच गळालं आणि त्या धाय मोकलून रडू लागल्या.

पार्टी परिसरात लॉस अँजेलस पोलिसांनी फ्रान्सेस यांना रडताना पाहिलं आणि चौकशी केली. तेव्हा त्यांना ऑस्कर चोरी झाल्याविषयी समजलं. सुदैवाने शोध घेतल्यावर पोलिसांना ही ट्रॉफी सापडली आणि फ्रान्सेस यांचा जीव भांड्यात पडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑस्कर चोरल्यानंतर आरोपीने हातात पुरस्कार धरुन फेसबुक लाईव्ह व्हिडिओ केला.



पोलिसांनी टेरी ब्रायन्ट या व्यक्तीला अटक केली आहे. मात्र फ्रान्सेस यांनी आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचार नसल्याचं सांगितलं. परंतु तक्रार करणं अथवा न करणं हा निर्णय फ्रान्सेस घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ब्रायन्टवर कायदेशीर कारवाई होणार आहे. आरोपी ब्रायन्ट पोलिसांच्या ताब्यात असून 20 हजार डॉलरचा जामीन भरल्यास त्याची सुटका होईल.

60 वर्षीय फ्रान्सेस यांनी दुसऱ्यांदा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. यापूर्वी 1997 मध्ये फिगो चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला होता. 1988 पासून त्यांना अभिनयासाठी पाच वेळा नामांकन मिळालं असून त्यापैकी दोनदा त्यांनी पुरस्कार पटकावला आहे.

अँड दि ऑस्कर गोज टू... द शेप ऑफ वॉटर


यावर्षी ऑस्कर पुरस्कारावर 'द शेप ऑफ वॉटर' चित्रपटाने मोहर उमटवली आहे. 'द शेप ऑफ वॉटर'ने सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शन या दोन मुख्य पुरस्कारांसह सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर आणि सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन असे चार पुरस्कार मिळवले.

'द शेप ऑफ वॉटर' चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे 13 विभागात नामांकनं मिळाली होती. ऑस्करच्या इतिहासात हा सर्वाधिक नामांकन मिळवणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.