मुंबई : श्रीदेवी यांच्या चाहत्यांनी अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. श्रीदेवी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातून लाखो चाहते मुंबईत दाखल झाले आहेत.


अंधेरीच्या सेलिब्रेशन क्लबमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता पार्ल्याच्या स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

आपल्या दमदार अभिनयाने श्रीदेवीने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं. मात्र एक व्यक्ती अशीही होता, ज्याचं मन श्रीदेवी कधीही जिंकू शकली नाही आणि ही व्यक्ती श्रीदेवीविषयीचा तिरस्कार कधी कमीही करु शकला नाही. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा अर्जुन कपूर आहे.

श्रीदेवीच्या निधनाची माहिती मिळताच अर्जुन कपूर वडिलांना आधार देण्यासाठी दुबईला रवाना झाला. श्रीदेवीचं पार्थिव दुबईहून मुंबई विमानतळावर आणि तिथून निवासस्थानी आणण्यात आलं. यादरम्यान प्रत्येक क्षणाला अर्जुन कपूर त्याचे वडिल बोनी कपूर यांच्यासोबत होता.

वेळेनुसार माणसाच्या मनातला तिरस्कार कमी होतो, असं म्हणतात. मात्र गेल्या 22 वर्षांपासून अर्जुन कपूरच्या मनात श्रीदेवीविषयी जो तिरस्कार होता, तो कधीही कमी झाला नाही.

अर्जुन कपूर 11 वर्षांचा असताना बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी लग्न करण्यासाठी अर्जुनची आई मोना कपूर यांच्याशी घटस्फोट घेतला होता. तेव्हापासून अर्जुन कपूरच्या मनात श्रीदेवीविषयी फक्त आणि फक्त तिरस्कार होता. मात्र श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जुन कपूर त्याचे वडिल बोनी कपूर यांच्यासोबत प्रत्येक क्षणाला उपस्थित होता.

श्रीदेवीच्या मुली जान्हवी आणि खुशी यांच्यासोबत आपण ना कधी बोलतो, ना कधी वेळ घालवतो, असं अर्जुन कपूरने गेल्या वर्षी मे महिन्यात एका मुलाखतीत सांगितलं होतं.

''श्रीदेवी आणि तिच्या दोन्ही मुली यांचा माझ्या आयुष्याशी काहीही संबंध नाही आणि माझ्यासाठी श्रीदेवी फक्त वडिलांची पत्नी आहे, त्यापलिकडे काहीही नाही,'' असंही अर्जुन म्हणाला होता.

बोनी कपूर यांनी दोन लग्न केले होते. पहिलं लग्न मोना कपूर यांच्याशी केलं. मोना यांना दोन मुलं होती, त्यापैकी एक अर्जुन कपूर आहे, तर अर्जुनच्या बहिणीचं नाव अंशुला आहे. श्रीदेवीला दोन मुली आहेत, ज्यांचं नाव जान्हवी आणि खुशी आहे.

काळाने या नात्यातला दुरावा कमी केला. अर्जुन त्याचे वडिल बोनी कपूर यांच्या जवळ तर आला, मात्र श्रीदेवीशी त्याचे संबंध कधीही सुधारले नाही.

अर्जुन कपूरने श्रीदेवीला कधीही आईचा दर्जा दिला नाही किंवा आई म्हणून हाकही मारली नाही. मात्र श्रीदेवीच्या निधनाची माहिती मिळताच तो वडिलांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला.