राष्ट्रपती, पंतप्रधानांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयने ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या मराठी शिक्षिकेचा फोटो शेअर करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
"मी आज जे काही मराठी बोलू शकतो, त्यासाठी जबाबदार असलेल्या स्त्रीला भेटण्याची संधी मिळाली. शाळेतील माझ्या मराठीच्या शिक्षिका... त्यांना भेटण्यासाठी ह्यापेक्षा उत्तम दिवस असूच शकत नाही. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा," असं कॅप्शन अक्षयने फोटोला दिलं आहे.
अभिनेता अक्षय कुमार उत्तम मराठी बोलता. अक्षय वयाच्या पाचव्या वर्षी मुंबईत आला. एक दिवस बसमध्ये प्रवास करताना मराठी कंडक्टरने त्याला पुढे सरकण्यास सांगितलं. पण मराठी येत नसल्याने त्याला काहीच समजलं नाही. दोन तीन वेळा सांगूनही न ऐकल्याने कंडक्टर अक्षयवर खेकसला. त्यावेळी त्याला मराठी भाषा शिकणं गरजेचं असल्याचं वाटलं. शिवाय त्याची पहिली गर्लफ्रेण्ड महाराष्ट्रीयन असल्याने त्याने मराठी शिकण्याचा निश्चय केला होता.