मुंबई : कॅसेट किंग गुलशान कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेल्या 'मोगल' चित्रपटातून अभिनेता अक्षय कुमारने काढता पाय घेतला आहे. अक्षयने सुचवलेले बदल दिग्दर्शकाला न रुचल्यामुळे झालेल्या मतभेदानंतर अक्षयने हा सिनेमा सोडल्याची चर्चा आहे.


टी सीरिज प्रस्तुत, सुदेश कुमारी यांची निर्मिती असलेल्या मोगल या चित्रपटाला सुभाष कपूर यांचं लेखन-दिग्दर्शन आहे. अक्षयकुमारने सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल सुचवले होते. काही गोष्टींचं पुनर्लेखन करण्याचा सल्ला अक्षयने दिला होता. मात्र दिग्दर्शकाने अक्षयच्या मागणीकडे कानाडोळा केला. त्यामुळे अक्षयने सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. अक्षयने याबाबत निर्मात्यांना कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

मार्च महिन्यात अक्षयने मोगल चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र त्या तारखा अक्षयने दुसऱ्या निर्मात्यांना दिल्याचं म्हटलं जातं.

https://twitter.com/akshaykumar/status/841861776497074176

मोगलचा दिग्दर्शक सुभाष कपूर आणि अक्षयने यापूर्वी 'जॉली एलएलबी 2' या सिनेमासाठी एकत्र काम केलं होतं.

विशेष म्हणजे, गुलशन कुमार यांची कन्या, प्रसिद्ध पार्श्वगायिका तुलसी कुमारने अक्षय हा गुलशन कुमार यांच्या भूमिकेसाठी अत्यंत योग्य अभिनेता असल्याचं म्हटलं होतं. 'अक्षय आणि माझ्या वडिलांमध्ये अनेक साम्यं आहेत. तोही पंजाबी आहे आणि आम्हीसुद्धा. तो दिल्लीचा आहे, तर माझे वडीलही दिल्लीचे होते. मला वाटतं तो ही व्यक्तिरेखा उत्तमरित्या साकारेल' असं ती म्हणाली होती.

अक्षयकुमारचा पॅडमॅन हा चित्रपट 26 जानेवारीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे, तर रजनीकांतसोबतचा '2.0' एप्रिलमध्ये रीलिज होणार आहे.