मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आज 52 वा वाढदिवस आहे. वाढदिवशी अक्षयने आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. अक्षय आगामी सिनेमात राजा पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणार आहे.


गेल्या महिन्यात रिलीज झालेल्या 'मिशन मंगल' सिनेमाच्या यशानंतर लगेचच अक्षयने त्याच्या पुढील सिनेमाची घोषणा केली आहे. अक्षय वर्षातून दोन तीन सिनेमे करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षात अक्षयचा प्रत्येक सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोच पण त्या सिमेमांची जोरदार चर्चाही होते.


पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारण्याबद्दल अक्षयने म्हटलं की, "भारतातील शूर आणि पराक्रमी राजा पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणे माझ्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. एक राष्ट्र म्हणून आपल्या आपल्या शूर, पराक्रमी, महान व्यक्तिमत्त्वांची माहिती लोकांसमोर मांडायला हवी."





पृथ्वीराज सिनेमाच्या माध्यमातून पृथ्वीराज चौहान यांचं शौर्य सर्वांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. येणाऱ्या पीढीसाठी ते प्रेरणा ठरतील. माझ्या वाढदिवशी या सिनेमाची घोषणा झाली आहे, ही माझ्यासाठी खूप खास बाब आहे, असंही अक्षयने म्हटलं.


यशराज फिल्म 'पृथ्वीराज' सिनेमाचा निर्मिती करणार आहे. तर सिनेमाचं दिग्दर्शन 'चाणक्य' मालिकेचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत. सिनेमा 2020 च्या दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे.