मुंबई : येत्या प्रजासत्ताक दिनाला अक्षयकुमारचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे दोन्ही सिनेमांच्या कमाईवर परिणाम होण्याच्या भीतीने अक्षयचे चाहते चांगलेच धास्तावले. मात्र 26 जानेवारीला दोनपैकी कुठलातरी एकच सिनेमा रीलिज होईल, असं सांगत अक्षयनेच दिलासा दिला आहे.
मी बॉक्स ऑफिसवर माझ्याच दोन सिनेमांची टक्कर का घडवेन, असं म्हणत अक्षयकुमारने 'पॅडमॅन' आणि '2.0' हे दोन्ही सिनेमे 26 जानेवारी 2018 लाच रीलिज होण्याची शक्यता फेटाळून लावली.
पॅडमॅन या चित्रपटाची निर्मिती अक्षयची पत्नी, अभिनेत्री ट्विंकल खन्नाने केली आहे. अरुणाचलम मुरुंगथम यांच्या आयु्ष्यावर हा चित्रपट आधारित आहे.
'पॅडमॅन हा होम प्रोडक्शन आहे. जर शंकरला 2.0 हा सिनेमा प्रजासत्ताक दिनी रीलिज करायचा असेल, तर मी आमचा सिनेमा पुढे ढकलेन. मात्र त्यांना आणखी वेळ हवा असेल, तर मी पॅडमॅन रीलिज करेन' असं अक्षय म्हणाला.
बहुप्रतीक्षित 2.0 हा रोबो चित्रपटाचा सिक्वेल असून यामध्ये अक्षयसोबत सुपरस्टार रजनीकांत झळकणार आहे. हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे.
प्रजासत्ताक दिनाला माझा एक तरी सिनेमा रीलिज होणार हे निश्चित, असंही अक्षयने सांगितलं. अनेक जण त्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत, मग मी ही संधी का सोडू, असं अक्षय म्हणतो.