मुंबई : अभिनेता अक्षयकुमारच्या एका चाहत्याला आपल्या लाडक्या खिलाडीकुमारसोबत सेल्फी काढणं चांगलंच महागात पडलं. सेल्फी काढल्यानंतर अक्षयच्या बॉडीगार्डने चाहत्याला डोक्यात मारल्याचं समोर आलं आहे. मात्र या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अक्षयने आपल्या फॅनची दिलगिरी व्यक्त केली आहे.
मुंबई विमानतळावर संबंधित चाहता आपल्या आवडत्या हिरोची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत होता. अक्षय येताच अनेकांप्रमाणे त्यालाही सेल्फीचा मोह आवरता आला नाही. त्याने अक्षयकुमार सोबत फोटो काढला आणि त्यानंतर अचानकपणे बॉडीगार्डचा 'प्रसाद' मिळाला. विशेष म्हणजे अक्षयसोबत अनेक वर्ष काम करणाऱ्या या सुरक्षारक्षकाचा पारा चढल्याचं पाहून उपस्थितांनाही आश्चर्य वाटलं. सेल्फी काढल्यानंतर अक्षय निघून गेल्यामुळे त्याला प्रकाराची त्यावेळी कुणकुणही लागली नाही.
मात्र या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर अक्षयने ट्विटरवरुन चाहत्याची दिलगिरी व्यक्त केली आहे. 'जे झालं ते अत्यंत दुर्दैवी होतं. मी त्यावेळी विमानतळावर होतो. मी काहीतरी गडबड झाल्याचं ऐकलं. वळून पाहिलं, पण मला काहीच चुकीचं नाही जाणवलं. घडलेला प्रकार जेव्हा माझ्या कानावर आला, तेव्हा मी माझ्या बॉडीगार्डला बोलावून घेतलं आणि सक्त ताकीद दिली. मी मनापासून चाहत्याची माफी मागतो.
https://twitter.com/akshaykumar/status/726071747074625538
चाहते माझ्यासाठी सर्वस्व आहेत आणि असे प्रकार खूप वेदनादायी आहेत. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची मी हमी देतो.'
2014 मध्ये मुंबईच्या मालाडमध्ये चित्रपटाचं शूटिंग सुरु असताना एका डेन्टिस्टने अक्षयशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बॉडीगार्डने त्याला चपराक लगावली होती. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं आणि सुरक्षारक्षकाला कडक शब्दांत समज देऊन सोडून देण्यात आलं.
अक्षय सध्या रोबो 2.0 सिनेमाचं शूटिंग करत असून त्याचा हाऊसफुल 3 हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.