Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : पुण्यात 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) शुभारंभ पार पडला असून या कार्यक्रमाला अनेक कलाकारांसह राजकीय नेत्यांनी हजेरी लावली आहे. पण 100 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनात कलाकारांची गैरसोय झालेली पाहायला मिळाली आहे. अनेक कलाकारांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

ज्येष्ठ कलाकारांची गैरसोय

नाट्यसंमेनात सहभागी झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर म्हणाल्या,"नाट्यसंमेलनात सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ कलाकारांनाही बसायला जागा मिळत नसल्याने उभं राहावं लागत आहे. ज्यांना तुम्ही तुमच्या गावात बोलावता त्यांची व्यवस्था नीट करा. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा. मोहन जोशी, सुरेश खरे यांचीही गैरसोय झाली". पिंपरी चिंडवडमध्ये पार पडलेल्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात ज्येष्ठ कलाकारांची गैरसोय होत आहे. नुकत्याच झालेल्या नाट्यपरिषद निवडणुकीत त्या निवडून ही आल्या आहेत आणि त्यांच्यासोबत अशी गैरसोय हे फारच दुर्दैवी आहे . सविता मालपेकर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथे कलाकाराला किंमत नाही तिथे अशी नाट्यसंमेलन घेऊन काय मिळवले, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. 

ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनीदेखील व्हिडीओ  शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. वंदना गुप्ते म्हणाल्या,"मी पुन्हा मुंबईला चालले आहे. मला एकही सभामंडप दिसलं नाही, सापडलं नाही. नाट्यसंमेलनासाठी मी नटून थटून आले होते. पण कार्यक्रमस्थळ न मिळाल्याने मी आता पुन्हा मुंबईला जात आहे". 

नेत्यांच्या अभिनयाला कोणती सीमा नसते : प्रशांत दामले

पिंपरी चिंचवड येथील नाट्यसंमेलनाच्या समारोपादरम्यान प्रशांत दामले (Prashant Damle) म्हणाले,"राजकारणासह नाटक वेडी असणारे नेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार इथे आले आहेत. त्यांनी माझी अनेक नाटकं पाहिलेली आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार असो की कोणताही नेता ते उत्तम कलावंत आहेत. त्यांना किती अभिनय करावं लागतं. आमचं अभिनय चाळीस फुटांत असतं, नेत्यांच्या अभिनयाला कोणती सीमा नसते".

प्रशांत दामले पुढे म्हणाले,"तीन वर्षे झाली की नाट्यगृह पडायला होतात. हॉटेल बांधणाऱ्यांना नाट्यगृह बांधायला दिली तर अशीच परिस्थिती निर्माण होते. ब्रिटिशांनी बांधलेल्या वास्तू आज ही टिकलेल्या आहेत, मग आपण बांधलेल्या नाट्यगृहांची बिकट अवस्था का होते? ब्रिटिश करतात तर आपण ही तशा वास्तू उभारू शकतो, हा मला विश्वास आहे. शेवटी पैसा जनतेचा आहे, तो वाया जाऊ नये. याची खबरदारी आपण घ्यायला हवीचं". 

संबंधित बातम्या

Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : नेते कलाकारांसारखे परफॉर्मन्स करतात, परंतु तुमच्यासारखी कला आम्ही करू शकत नाही; मुख्यमंत्र्यांचा प्रशांत दामलेंना टोला