कँनडाच्या नागरिकत्वावरून ट्रोल होत असतानाच आता अक्षय कुमारचा एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल केला जात आहे. हा व्हिडीओ कॅनडामध्ये शुट केलेला आहे. अक्षय कुमार या व्हिडीओमध्ये कॅनडावासियांना सांगतो की, "मी माझ्या फिल्मी करिअरमधून निवृत्त झाल्यानंतर कॅनडामध्ये स्थायिक होणार आहे."
हा व्हिडीओ कॅनडामधील टोरांटो येथील आहे. टोरांटोमधील नागरिकांना अक्षय कुमार म्हणतो की, "मला तुम्हाला सांगायचं आहे की, हे (टोरांटो, कॅनडा) माझं घर आहे. मी इंडस्ट्रीमधून (फिल्मी जग) निवृत्त झाल्यानंतर कॅनडामध्ये स्थायिक होणार आहे."
व्हायरल होत असलेला तो व्हिडीओ पाहा
अक्षय कुमारच्या नागरिकत्वाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून देशभर चर्चा सुरु आहेत. त्यावरुन त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाऊ लागले आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी अक्षय कुमारने स्वत: त्याच्या नागरिकत्वाबाबत भाष्य केले होते.
VIDEO | कॅनेडियन नागरिकत्त्वावर अक्षय कुमारचं काय म्हणणं आहे? | एबीपी माझा
अक्षय कुमार म्हणाला की, मला माझी देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही. अनेकांकडून माझ्या नागरिकत्वाबाबत उगाचच रुची दाखवली जात आहे आणि सातत्यानं त्यावरुन वाद निर्माण केला जात आहे. मी माझं नागरिकत्व कधीही लपवलेलं नाही आणि ते कधी नाकारलेलं नाही. मात्र मी गेल्या सात वर्षांपासून कॅनडाला गेलो नाही, ही गोष्टही खरी आहे. मी भारतात काम करतो आणि भारतातील सर्व कर भरतो. एवढ्या वर्षात मला कधीही भारताप्रती असलेलं प्रेम सिद्ध करावं लागलं नाही."