Aflatoon: ‘अफलातून’ (Aflatoon) हा मराठी चित्रपट येत्या 21 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
‘अफलातून’ या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, विष्णू मेहरा, रेशम टिपणीस या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा धमाल टीझर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिद्धार्थ जाधवनं ‘अफलातून’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'कॉमेडी बघा, कॉमेडी ऐका, कॉमेडी बोला, घेऊन आलो आहोत अफलातून कॉमेडीचा धमाकेदार टीझर ! अफलातून - 21 जुलैपासून फक्त चित्रपटगृहात.'
श्री, आदी आणि मानव या तीन डिटेक्टिव्ह मित्रांची ही गोष्ट असून फसवल्या गेलेल्या दुर्देवी मारिया नावाच्या मुलीला मदत करण्याचा विडा हे तिघे उचलतात. ही मदत करताना येणाऱ्या अडचणीवर ते कसे मात करतात? याची रंजक कथा ‘अफलातून’ चित्रपटात पहायला मिळणार आहे.
पाहा टीझर
‘अफलातून’ चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीप दंडवते यांचे आहेत. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन सर्वेश परब याचे आहे. मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचे स्वरसाज लाभला आहे. संगीत आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी सांभाळली आहे. चित्रपटाच्या संगीताचे हक्क सारेगामाकडे आहेत. नृत्यदिग्दर्शन रंजू वर्गीस यांचे आहे.
सिद्धार्थ जाधवनं अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या हटके स्टाईलनं आणि नृत्यशैलीनं सिद्धार्थ प्रेक्षकांची मनं जिंकतो. सिद्धार्थच्या दे धक्का, जत्रा, दे धक्का-2, टाइम प्लिज, लोच्या झाला रे या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. सिद्धार्थनं मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. अभिनेता रणवीर सिंहसोबत सिद्धार्थन सिम्बा या चित्रपटामध्ये काम केलं. आता सिद्धार्थच्या ‘अफलातून’ या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या