'ऐ दिल..'मध्ये फवादच्या चेहऱ्यावर 'या' हिरोचा मुखवटा
एबीपी माझा वेब टीम | 10 Oct 2016 07:54 PM (IST)
मुंबई : पाकिस्तानी कलाकारांसाठी बॉलिवूडचे दरवाजे बंद करण्यात आल्यानंतर शाहरुखचा 'रईस' आणि करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल'वर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. रईसमधून माहिरा खानला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर आता 'ऐ दिल..'मधून फवादचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये फवाद खानच्या चेहऱ्यावर सैफ अली खानचा मुखवटा चढवण्यात येणार आहे. रिप्लेसमेंट टेक्नॉलॉजीचा वापर करुन फवादच्या चेहऱ्याऐवजी सैफचा चेहरा वापरण्यात येईल. तर 'रईस' चित्रपटात माहिरा खान ऐवजी नव्या अभिनेत्रीला घेण्यात येणार आहे. उरीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात तीव्र रोष निर्माण झाला. तसंच मनसेनं पाकिस्तानच्या कलाकारांना विरोध करत हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिला. त्यानंतर आता 'ऐ दिल है मुश्कील'चा निर्माता करण जोहर आणि 'रईस' चित्रपटाचा निर्माता रितेश सिधवानी यांनी दोन्ही पाक कलाकारांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे.