पुणे : प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर कारवाई होण्याची शक्यता आहे. सिनेमाच्या चित्रिकरणासाठी मैदान भाड्याने देऊन लीजच्या कराराचा भंग केल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला आहे.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना हिंदी सिनेमाच्या चित्रिकरणासाठी सेट उभारण्यास मैदान भाड्याने दिले आहे. यामुळे विद्यापीठाच्या जागेचा व्यावसायिक वापर झाला असून, लीजच्या कराराचा भंग झाल्याचा ठपका पुणे शहर तहसिल कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला आहे, असा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विद्यापीठावर कारवाईसुद्धा होऊ शकते.

संपूर्ण हिवाळ्यात मैदानावर सेट असल्याने विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान, तर नागरिकांना व्यायामासाठी जागा मिळाली नाही. आमची हक्काची जागा आम्हाला परत कधी मिळणार, असा सवाल विद्यार्थी विचारत आहेत.

चित्रिकरण लवकर पूर्ण करा, विद्यापीठाच्या मंजुळेंना सूचना

विद्यापीठ आवारातील मैदानात सुरु असलेलं चित्रिकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना नागराज मंजुळेंना दिल्या आहेत, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने दिली.

“नागराज मंजुळे फुटबॉलशी संबंधित विषयावर हिंदी चित्रपट काढत आहेत. त्यात महानायक अमिताभ बच्चन यांचीही भूमिका असणार आहे. त्याच्या चित्रिकरणासाठी नागराज मंजुळे यांनी विद्यापीठाच्या मैदानातील काही भागाची परवानगी मागितली होती. हा चित्रपट खेळावर आधारित असल्याने विद्यापीठाकडून त्याचा सहानभूतीपूर्वक विचार करण्यात आला होता व त्याला परवानगी देण्यात आली होती.”, असेही विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.