नवी दिल्ली: 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातील ऐश्वर्या राय-बच्चन आणि रणबीर कपूर यांच्या इंटिमेट सीन्सवरुन सर्वत्र बरीच चर्चा झाली. विशेष म्हणजे, या सीन्समुळे बच्चन कुटुंबीय ऐश्वर्यावर नाराज असल्याचेही वृत्त होते. पण आता यावरुन ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चनने मौन सोडले आहे. आपल्याला ऐश्वर्यावर गर्व असल्याची प्रतिक्रिया त्याने एका कार्यक्रमावेळी दिली.


नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अभिषेकला या सीन्सवरुन प्रश्न विचारला असता, तो म्हणाला की, ''मी तेव्हा माझ्या फुटबॉल टीमसोबत व्यस्त होतो. त्यामुळे अद्याप सिनेमा पाहिलेला नाही. मात्र ऐश्वर्याने दाखवलेले काही सीन्स मी पाहिले आहेत. मला वाटतं ती, अधिकच स्टनिंग (सुंदर) दिसत आहे.'' तसेच आपण लवकरच सिनेमा पाहणार असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

याशिवाय सिनेमाच्या कमाईसाठी चित्रपट दिग्दर्शक करण जोहरचेही त्याने यावेळी अभिनंदन केले. अभिषेक म्हणतो की, ''मी करण जोहर आणि त्याच्या संपूर्ण टीमसाठी खूप आनंदी आहे, त्यांना माझ्या सदैव शुभेच्छा आहेत.''

ऐश्वर्या राय-बच्चन, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि फवाद खानची मुख्य भूमिका असलेल्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. या सिनेमाने आत्तापर्यंत 90 कोटींची कमाई केली आहे.