Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या सिनेमामुळे चर्चेत आला आहे. 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमासाठी आमिरच्या लेकाची म्हणजेच जुनैदची (Junaid Khan) निवड झाली होती. एबीपी माझाच्या 'हार्ट टू हार्ट' या खास कार्यक्रमात आमिरने यासंदर्भात खुलासा केला आहे.
एबीपीच्या 'हार्ट टू हार्ट' या कार्यक्रमात आमिर म्हणाला,"लाल सिंह चड्ढा' या सिनेमात मला वेगवेगळ्या वयोगटातील लालचे पात्र साकारायचं होतं. माझ्या लेकाने जुनैदने या सिनेमाची स्क्रीनटेस्ट केली होती. जुनेदची स्क्रीनटेस्ट मला आवडली. त्यानंतर मी ती माझ्या जवळच्या 100 लोकांना दाखवली. त्यातील 98 लोकांना ती आवडली. जुनैदनेच लालचे पात्रं साकारावं असं सर्वांना वाटत होतं".
आमिर पुढे म्हणाला,"एकीकडे जुनैदवर शिक्कामोर्तब होत होते. तर दुसरीकडे या सिनेमासाठी मी दाढी वाढवली होती. मलाही लाल सिंह जुनैदच आहे, असं वाटू लागलं होतं. त्यामुळे मी दाढी काढली. पण मी लाल सिंहचे पात्र साकारावं असं अतुल कुलकर्णीचं मत होतं. त्याच्यामते 'फॉरेस्ट गंप' हा एपिसोडिक सिनेमा आहे. त्याचा एक दर्जा आहे. त्यामुळे 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमासाठी मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणारा कोणताही अभिनेता नसावा असे अतुल म्हणाला. या सिनेमासाठी नामांकित चेहरा असणं गरजेचं होतं. पण या सिनेमात जुनैदच्या कामाचा सूर पकडण्याचा मी प्रयत्न केला".
सुपरस्टार अभिनेता ते सिनेनिर्माता... आमिरचा निर्माता होतो तेव्हा...
एखाद्या सिनेमाची निर्मिती करताना आमिर अनेक गोष्टींचा विचार करतो. आमिर म्हणतो,"सिनेमाचे कथानक मला वाचण्यापेक्षा ऐकायला जास्त आवडतं. ते कथानक मला भावलं तर मी त्या गोष्टीचा सिनेमा म्हणून विचार करायला सुरुवात करतो. दिग्दर्शकाच्या नजरेतून मी सिनेमा पाहतो. सिनेमा एकदा करायचं ठरवलं की मी तो करतोच. तारे जमिन पर सारखा सिनेमा 10 कोटींचा गल्ला जमवेल हे मला माहित असतं. हे सिनेमे धंदा करणारे सिनेमे नसतात. पण असे सिनेमे करण्याची माझी इच्छा असते. सिनेमा बनवताना जो उद्देश असतो तो साध्य झाला असेल तर माझी सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढते".
आमिर खान भूमिकेची तयारी कशी करतो?
आमिर जे पात्रं साकारणार त्या पात्राची निरागसता समजून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक पात्रासाठी वेगळी मेहनत घेतो. दिग्दर्शकासोबत जास्तीत जास्त चर्चा करतो.
संबंधित बातम्या