मुंबई: बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज 76 वा वाढदिवस. बॉलिवूडचा शहनशहा, बिग बी, महानायक अशी अनेक बिरुदं मानाने मिरवणारा हा बॉलिवूडचा बाप..वयाच्या 76 व्या वर्षीही रुपेरी पडद्यावर तितक्याच सशक्तपणे नायकाच्या भूमिकेत वावरणारा आणि प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी ठरणारा हा रुपेरी पडद्यावरचा अनभिषिक्त सम्राट.


अमिताभ बच्चन... पृथ्वीवरचा एकही देश असा नसेल की, महानायकाची ख्याती तिथं पोहोचलेली नाही. जिवंतपणी दंतकथा बनण्याचं भाग्य खूप कमी लोकांना मिळतं. त्यात अमिताभ अव्वल आहेत. त्यांचं रिअल लाईफसुद्धा एखाद्या फिल्मपेक्षा कमी थरारक नाही. सुरुवातीला आलेलं अपयश, त्यानंतर मिळालेलं अमाप यश, त्यानंतर करिअरला लागलेली घसरण, गांधी-नेहरु परिवाराशी दुरावलेले संबंध अशा कधी निसरड्या तर कधी पक्क्या रस्त्यावरुन अमिताभ चालत राहिले. पण हे सगळं सुरु असताना अमिताभ कधी थांबले नाहीत. चलते रहना हा त्यांच्या आयुष्याचा फॉर्म्युला राहिला. त्यामुळेच वयाच्या साठीत अमिताभ सुपरस्टार्स आणि मेगास्टार्सना टक्कर देत उभे राहिले. आज त्यांच्या 76 व्या वाढदिवशीसुद्धा सगळ्यात बिझी स्टार म्हणून ते परिचित आहेत.

76 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातले 76 मजेशीर किस्से

1. ज्येष्ठ अभिनेत्री नरगीसमुळे अमिताभ यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. 1965 च्या युद्धादरम्यान नरगीस या अमिताभ यांची आई तेजी बच्चनसोबत इंडियन आर्मी हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या.  नरगीस यांनीच बिग बींची स्क्रीन टेस्ट घडवून आणली.

2. सुरुवातीच्या काळात बिग बींनी जाहिरातींच्या जिंगल्ससाठी आपला आवाज दिला. त्यावेळी प्रत्येक जिंगल्समागे त्यांना 50 रुपये  मिळायचे. अभिनयाच्या या शहेनशहाला खरंतर इंजिनियर व्हायचं होतं. इतकंच नाही तर इंडियन एअर फोर्समध्ये भरती होण्याची  तीव्र इच्छा  होती.

3. बॉलिवूडच्या या शहेनशहाला  करियरच्या सुरुवातीला अनेक निर्मात्यांनी नाकारलं. निर्माता  ताराचंद बरज्याता यांनी तर बिग बी हिरोपेक्षा कवीच अधिक दिसतात असं म्हण्टलं होतं.

4.मृणाल सेन यांच्या भुवन शोम  या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बंगाली चित्रपटानं बिग बींना पहिली ओळख दिली. या सिनेमात  बिग बींनी  कथानकाच्या सूत्रधाराला आपला आवाज दिला. यावेळी विशेष आभारमध्ये त्यांचं नाव अमिताभऐवजी अमित असं लिहिण्यात आलं .

5.  १९७० ला आलेल्या बॉम्बे टॉकी या सिनेमात बिग बी छोट्याशा सीनमध्ये आणि तेही एक्ट्राजमध्ये दिसले होते.मात्र  एडिटमध्ये त्या सीनलाही कात्री लागली.या सिनेमात मुख्य भूमिकेत होते शशी कपूर … विशेष म्हणजे पुढे याच शशी कपूर यांनी अमिताभच्या  अनेक सिनेमात दुय्यम महत्त्वाची भूमिका साकारली.

6. १९६९ मध्ये आलेला सात हिंदुस्थानी हा बिग बींचा पहिला सिनेमा… याही सिनेमासाठी पहिली पसंती होती अभिनेते टिनू आनंद मात्र टिनू आनंद यांनी सिनेमातून माघार घेतली आणि ही भूमिका बिग बींना मिळाली.

7.  सात हिंदुस्थानी हा अभिनेता म्हणून बिग बींचा एकमेव  ब्लॅक अॅण्ड व्हाईट सिनेमा होता..

8.  अमिताभ यांना त्यांच्या  खडतर प्रवासात मोलाची साथ लाभली ती विनोदाचे बादशाह मेहमूद यांची.  मेहमूद यांच्या शिफारशीमुळे  बिग बींना बॉम्बे टू  गोवा  या सुपरहिट सिनेमात काम करण्याची संधी मिळाली.

9.  आनंदसारख्या  सुपरहिट सिनेमावेळीही मेहमूद यांनीच अमिताभना मोलाचं मार्गदर्शन केलं.शिवाय राजेश खन्नासारख्या सुपरस्टार सोबत काम करण्याचा आत्मविश्वासही  दिला.

10.  ज्येष्ठ दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांनी  अमिताभ यांच्यातला नायक हेरला. या जोडीने आठ सिनेमात एकत्र काम केलं.ज्यामध्ये आनंद, नमक हराम, अभिमान, मिली, चुपके चुपके आलाप, जुर्माना बेमिसाल या सिनेमात अमिताभ महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. तर गोलमाल आणि बावर्ची या सिनेमात बिग बींनी गेस्ट अपयरंसमध्ये केला.

11.  १९७३ मध्ये  आलेला नमक हाराम हा बिंग बींचा हिट सिनेमा. या सिनेमाच्या निमित्ताने राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, आणि हृषिकेश मुखर्जी ही जोडी पुन्हा एकदा  एकत्र आली आणि उत्तम कलाकृती प्रेक्षकांपुढे सादर केली…या सिनेमासाठी बिग बींना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून फिल्मफेयर पुरस्कार मिळाला

12.   अमिताभ  यांनी  इंडस्ट्रीतल्या अनेक नायिकांसोबत  पडद्यावर रोमान्स केला …पण  त्यांच्यामते,  सिनेसृष्टीतली सर्वात सुंदर नायिका आहे वहिदा रहमान 

13. १९७१ मध्ये आलेला रेश्मा और शेरा या मल्टि स्टारर सिनेमात बिग बी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले….  हा  चित्रपट ४४ व्या अॅकॅडमी अवॉर्डसाठी म्हणजे ऑस्करसाठी भारताकडून पाठवण्यात आला होता….. मात्र या सिनेमाला नामांकन मिळू शकलं नाही ….

14 71 मध्ये आलेला गुड्डी या  सिनेमासाठी अमिताभ यांना पहिली पसंती देण्यात आली होती…त्यानंतर या सिनेमातून त्यांनी माघार घेतली आणि धर्मेंद्र यांना ही भूमिका मिळाली…विशेष म्हणजे गुड्डी सिनेमानंच  जया बच्चन यांचं आयुष्य पालटलं,,..

15.   महानायक पहिल्यांदा व्हिलनच्या भूमिकेत दिसले ते परवाना या सिनेमात…..  त्यांच्या याच सिनेमाच्या कथेने प्रेरित होवून २००७मध्ये  जॉनी गद्दार या सिनेमाची  निर्मिती करण्यात आली…

16.  १९७१ मध्ये  इंडस्ट्रीतल्या मुख्य कलाकारांना वर्षभरात केवळ सहाच चित्रपट करण्याची परवानगी देण्यात आली होती…..याच दरम्यान  प्यार की कहानी या सिनेमासाठी जितेंद्र यांची निवड करण्यात आली मात्र जितेंद्र यांनी  त्यावर्षी  अगोदरच सहा चित्रपट साईन केले होते… परिणामी प्यार की कहानीमध्ये  बिग बींना  काम करण्याची संधी मिळाली

17.  बंधे हात  या सिनेमात अमिताभ बच्चन  पहिल्यांदाच डबल रोलमध्ये दिसले. विशेष  म्हणजे या सिेनमाच्या निमित्ताने  त्यांनी पहिल्यांदाच मर्सिडिज गाडी चालवली होती.

18.   अमिताभ यांच्या वाट्याला जेवढ्या हिट फिल्म्स आल्या तितक्याच चांगल्या संधींनाही त्यांना मुकावं लागलं…..आणि त्याचं उदाहरण मिस्टर इंडिया….  शेखर कपूर  दिग्दर्शित  मि. इंडियासाठी पहिली पसंती  होते अमिताभ बच्चन  मात्र त्यानंतर अनिल कपूरच्या वाट्याला ही भूमिका आली.

19.  सिद्धार्थ या अमेरिकन फिल्मसाठी अमिताभ बच्चन यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती… मात्र पुढे  ही  भूमिका शशी कपूर यांच्या पदरात पडली…. पण बिग बींना याचं अजिबात दु:ख झालं नाही  कारण या सिनेमात अनेक किसिंग सीन्स आणि हॉट सीन्स  होते….

20.  १९७३ चा जंजीर  हा सिनेमा अमिताभच्या आयुष्य़ातला टर्निंग पॉईंट ठरला…. त्यावेळी अनेक स्टार्सनी जंजीर करण्यास नकार दिला मात्र अमिताभला या सिनेमानं रातोरात स्टार केलं….आणि बॉलिवूडला अँग्री यंग मॅन मिळाला,….

21.  जंजीरनंतरच अमिताभ बच्चन आणि जया भादुरी विवाह बंधनात अडकले,,,….11 मेला जंजीर रिलीज झाला आणि ३ जूनला या दोघांनी लग्न केलं…

२२. मनोज कुमार दिग्दर्शित रोटी कपडा और मकान  या सिनेमात बिग बी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले….मनोज कुमार, शशी कपूर, झीनत अमानसारखे दमदार कलाकार असतानाही बिग बींना  साकारलेला विजय लक्षात राहतो…..या सिनेमानं बॉक्स ऑफिसवरही तुफान यश मिळवलं….

२३.  बिग बींची आणखी एक खासियत म्हणजे ते एकाच वेळी उजव्या आणि डाव्या  दोन्ही हातांनी लिहू शकतात….

२४. ब्लॉकबस्टर शोले सिनेमातल्या जयच्या भूमिकेसाठी आधी शत्रुघ्न सिन्हा यांच्या नावाचा विचार केला गेला…मात्र लेखक सलीम, जावेद आणि धर्मेंद्र यांनी या भूमिकेसाठी अमिताभ यांच्या नावाची शिफारस केली आणि पुढे इतिहास घडला

25. शोले सिनेमा जेव्हा रिलीज झाला तेव्हा सुरुवातीला तिकीटबारीवर मिळालेला प्रतिसाद निराशाजनक होता. सिनेमाच्या शेवटी जयचा होणारा मृत्यू हे त्यामगचं कारण आहे असं निर्मात्यांना वाटत होतं.  त्यामुळे क्लायमॅक्स बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. जयचा मृत्यू न दाखवता त्याला जिवंत ठेवायचं असा बदल करण्यात आला आणि शूटिंगची तारीखही ठरली. पण हे सगळं होईपर्यंत बॉक्स अॉफिसवरचे अाकडे वाढत गेले आणि शोले जसा होता तसाच अॉल टाईम हिट ठरला.

26 कभी कभी हा अमिताभचा एकमेव सिनेमा आहे ज्या सिनेमात बिग बी सोबत त्यांचे आई वडिलही रुपेरी पडद्यावर झळकले होते. राखी आणि अमिताभच्या लग्नाचा एक सीन या सिनेमात आहे ज्यात राखीच्या आई-वडिलांची भूमिका हरीवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांनी केलीय. एकमेव दुग्धशर्करा योग

27 'दिवार' सिनेमात अमिताभच्या मृत्यूचा जो सीन आहे त्या सीनमधला एकही डायलॉग लिहिला गेला नव्हता. पडद्यावर जे काही दिसलं ते अमिताभने उत्सफूर्तपणे साकारलेलं होतं. एकही संवाद लिहिलेला नव्हता…

28. 1977 मध्ये आलेल्या शतरंज के खिलाडी या सिनेमात अमिताभने कोणतीच भूमिका केली नव्हती. पण या सिनेमाचा सूत्रधार म्हणून अमिताभचा आवाज वापरला गेला होता. हा सिनेमा त्यावर्षीच्या अॉस्कर पुरस्कारांसाठी भारतातर्फे पाठवण्यात आला होता.

29 मनमोहन देसाई यांनी दिग्दर्शित केलेल्या अमर अकबर अॅन्थनी आणि परवरिश या दोन्ही सिनेमांचं शूटिंग एकाचवेळी करण्यात आलं होतं.

30. 1978 हे वर्ष अमिताभसाठी व्यावसायिकदृष्ट्या चांगलंच यशस्वी ठरलं. त्या वर्षी सगळ्यात जास्त कमाई करणारे पहिले तीन सिनेमे हे अमिताभचे होते. मुकद्दर का सिकंदर, त्रिशुल आणि डॉन या तीन सिनेमांनी बॉक्स अॉफिसवर अक्षरश: राज्य केलं.

31. डॉन सिनेमातलं खयके पान बनारसवाला हे सुपरहिट गाणं सुरुवातीला सिनेमात नव्हतं. दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांनी सांगितल्यानंतर ह्या गाण्याला सिनेमात स्थान देण्यात आलं.

32. अमिताभचा मिस्टर नटवरलाल हा सिनेमा त्यावेळचा कुख्यात ठकसेन मिथिलेश कुमार श्रीवास्तव उर्फ नटवरलाल याच्यावर बेतलेला होता. या ठकसेनची भूमिका अमिताभने साकारली.

33 'मिस्टर नटवरलाल' या सिनेमातून अमिताभ पहिल्यांदाच गायक म्हणून समोर आला.  'मेरे पास आवो मेरे दोस्तो' हे अमिताभने गायलेलं गाणं चांगलंच गाजलं.

34. सिलसिला सिनेमात अमिताभच्या नायिका म्हणून परवीन बाबी आणि स्मिता पाटील यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्यासोबत शूटिंगला सुरुवातही झाली. पहिल्या दिवशीचं शूटिंग पार पडलं आणि यश चोप्रांनी दोघींनाही वगळण्याचा निर्णय घेतला. त्यांनंतर त्यांची जागा रेखा आणि जया बच्चन यांनी घेतली.

35.  'याराना' सिनेमातल्या 'सारा जमाना' या गाण्यात अमिताभने घातलेला लाईटिंगवाला शर्ट तुम्हाला आठवत असेलच. या शर्टची आयडिया अमिताभचीच होती.  द इलेक्ट्रिक हॉर्समॅन या सिनेमात रॉबर्ट रेडफोर्डने घातलेला सूट पाहून अमिताभने हा प्रयोग केला होता.

36. ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार हे अमिताभचे प्रेरणास्थान. शक्ती सिनेमात त्यांच्यासोबत काम करण्याची मिळालेली संधी ही गोष्ट माझ्या करीयरमधली सगळ्यात मोठी गोष्ट असल्याचं अमिताभ सांगतो.

37 कालिया सिनेमातलं जहाँ तेरी ए नजर है सुपरहिट गाणं 'नमक हलाल'च्या सेटवर चित्रित करण्यात आलं होतं. वेळ आणि पैसे वाचवण्यासाठी निर्मात्यांनी हा निर्णय घेतला होता.



38. 1983 साली आलेल्या 'अंधा कानून' या सिनेमातल्या खलनायकांची नावं अमिताभच्या सुपरहिट अमर- अकबर - अॅन्थनी या सुपरहिट सिनेमावरुन ठेवण्यात आली होती.

39. कुली सिनेमाच्या सेटवर अमिताभचा झालेला अपघात त्याचे चाहते कधीच विसरु शकणार नाहीत. मृत्यूच्या दारातून हा महानायक परत आला होता. तुमचा विश्वास नाही बसणार पण या अपघाताच्या केवळ दोन दिवस अाधी दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांना अमिताभच्या मृत्यूचं स्वप्न पडलं होतं.  ही गोष्ट स्मिता पाटील यांनी अमिताभला लगेचच फोन करुन कळवली होती. त्यानंतर अगदी दोन दिवसात हा भयंकर अपघात घडला.

40. या अपघातानंतर कुली सिनेमाचा शेवट बदलण्यात आला. अमिताभमे साकारलेली व्यक्तीरेखा मरते असं न दाखवता शेवट गोड करण्यात आला. हिच गोष्ट पुकार सिनेमाच्या बाबतीतही करण्यात आली.

41. सुपरहिट ठरलेल्या शराबी सिनेमाची मुहूर्तमेढ न्यूयॉर्क ते वेस्ट इंडिज या विमान प्रवासात रोवली गेली.  एका कॉन्सर्टसाठी अमिताभ वेस्ट इंडिजला चालले होते. त्या प्रवासात प्रकाश मेहरांनी शराबीची गोष्ट त्याला एेकवली आणि हा सिनेमा करण्याचा आग्रह धरला.

42. शराबी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभच्या हाताला दुखापत झाली होती. फटाके फोडताना त्याचा डावा हात भाजला होता. शूटिंग कॅन्सल करणं तर शक्य नव्हतं. मग त्यावर एक शक्कल काढण्यात आली. अमिताभचे बहूतांशी सीन्स त्याचा डावा हात पँटच्या खिशात ठेऊन चित्रित करण्यात आले. हा सिनेमा पुन्हा जेव्हा कधी बघाला तेव्हा थोडं लक्ष दिलंत तर तुमच्या ते लगेचच लक्षात येईल.

43. 1984 साली आलेला 'इन्कलाब' हा सिनेमा 'चक्रव्यूह' या कन्नड सिनेमावर बेतला होता. या सिनेमाने रौप्यमहोत्सव साजरा केला पण म्हणावं तेवढं व्यावसायिक यश मिळालं नाही. पण हाच सिनेमा 90 च्या दशकात जेव्हा नव्याने रिलीज केला गेला तेव्हा तो भलताच यशस्वी ठरला. कलकत्त्याच्या मॅजेस्टिक थिएटरमध्ये हा सिनेमा सलग 50 दिवस हाऊसफुल गर्दीत चालला.

44. दिग्दर्शक मनमोहन देसाईंनी दिग्दर्शित केलेला मर्द हा एकमेव असा सिनेमा आहे ज्यात फक्त एकच हिरो आहे. त्यांचे बाकी सगळे सिनेमे हे मल्टीस्टारर होते. यात अमिताभची नायिका म्हणून डिम्पल कपाडियाची निवड करण्यात आली होती पण पैशांवरुन मतभेद झाल्याने अमृता सिंगला संधी देण्यात आली.

45. मनमोहन देसाई आणि अमिताभ या जोडीचा मर्द हा शेवटचा ब्लॉकबस्टर सिनेमा मानला जातो.

46. सुपरहिट मिस्टर इंडिया सिनेमासाठी आधी अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली होती. एका सीनचं शूटिंगही झालं होतं. पण त्यानंतर माशी कुठे शिंकली माहित नाही. 'मिस्टर इंडिया' अमिताभच्या हातून निसटला.

47. 'शहेनशाह' हा सिनेमा अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड मानला जातो. गंमत म्हणजे या सिनेमाची गोष्ट जया बच्चन यांनी लिहिली आहे.

48. अमिताभ आणि शबाना आझमी यांची मुख्य भूमिका असलेला मैं आझाद हूँ हा सिनेमा  'मीट जॉन दो'  ह्या क्लासिक हॉलिवूडपटावर बेतलेला होता. टिन्नू आनंदने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा जावेद अख्तर यांनी लिहिला होता.

49. अमिताभच्या 'आज का अर्जुन' या सिनेमाचं आधीच नाव होतं 'कौन सुने फरीयाद'. नंतर ते बदलण्यात आलं आणि हा सिनेमा आज का अर्जुन नावाने रिलीज करण्यात आला.

50. सुपरहिरो फँटसी सिनेमा अजुबाला भारतात जबरदस्त यश मिळालं. त्यानंतर हा सिनेमा रशियात रिलीज करण्यात आला. 'द रिटर्न अॉफ थीफ अॉफ बगदाद' या नावाने रिलीज झालेल्या या सिनेमात रशियातही चांगला व्यवसाय केला.

51. 'हम' सिनेमातलं जुम्मा चुम्मा हे गाणं आजही चाहत्यांना थिरकायला लावतं. या गाण्याच्या शूटिंगला तब्बल 15 दिवस लागले होते.

52 हम सिनेमातलं हे गाणं खरं तर रमेश सिप्पींच्या 'राम की सीता, श्याम की गीता' या सिनेमासाठी बनवण्यात आलं होतं. पण तो सिनेमा पूर्ण होऊ न शकल्यानं हम सिनेमासाठी हे गाणं वापरण्यात आलं.

53 खुदा गवाह या सिनेमाचं शूटिंग अफगानिस्तानात झालंय. हे शूटिंग सुरु असताना अफगानिस्ताच्या राष्ट्राध्यक्षांनी एअरफोर्सचा ताफा सुरेक्षसाठी  दिला होता. अफगाणीस्तानाच्या आजवरच्या इतिहासातला सर्वाधिक पाहिलेला सिनेमा म्हणून खुदा गवाहची नोंद झालीय.

54. 'खुदा गवाह' या सिनेमात अमिताभ पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार होता. एका छोट्या भूमिकेसाठी त्याची निवड झाली होती. ६ दिवसांच्या शूटिंग शेड्युलमध्ये अशा काही घडामोडी घडल्या की अमिताभ थेट मुख्य नायक म्हणून समोर आला.

55. अमिताभच्या मृत्यूदाता या सिनेमातून दलेर मेहंदी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकला. हा सिनेमा फ्लॉप झाला पण यातलं ना ना ना रे हे गाणं सुपरहिट ठरलं.

56. मेजर साब सिनेमातलं 'सोना सोना'  हे गाणं खरं तर लाल बादशाह सिनेमासाठी बनवण्यात आलं होतं. पण त्यात गाण्यासाठी काहीच स्कोप नसल्यानं हे गाणं मेजर साबच्या झोळीत पडलं.

57. 'ब्लॅक' सिनेमातल्या एका सीनमध्ये अमिताभचा बॉडी डबल म्हणून रणबीर कपूरने काम केलंय. रणबीर त्यावेळी संजय लीला भन्साळींसोबत सहाय्यक म्हणून काम करत होता.

58. अमिताभच्या ब्लॅक सिनेमाने तब्बल 11 फिल्मफेअर पुरस्कार पटकावलेत. हा एक विक्रम आहे. ब्लॅकच्या आधी 'दिलवाले दुल्हनिया ले जायेेंगे' आणि 'देवदास' या सिनेमांनी प्रत्येकी दहा फिल्मफेअर पुरस्कार जिंकले होते.

59. अमिताभसाठी वय हा फक्त एक आकडा आहे. काम करण्याची त्यांची एनर्जी कोणालाही लाजवले अशीच आहे. शुट अाऊट अॅट लोखंडवाला या सिनेमातले तब्बल 23 सीन्स त्यांनी फक्त पाच तासात पूर्ण केले होते.

60.बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांपुरता जर विचार करायचा झाला तर आणखी एक विक्रम बिग बींनी केलाय तो म्हणजे सर्वाधिक डबल रोल्स करण्याचा.

61. अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंच चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकवलाय. अग्नीपथ, ब्लॅक, पा आणि 2015 मध्ये आलेला पिकू या सिनेमांसाठी बिग बींना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

62. बिग बींना सोशल मीडियाचं अजिबात वावडं नाही. ट्वीटर आणि फेसबुकवर ते नेहमीच सक्रीय असतात. ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या तीन कोटींच्या घरात आहे.

63. गुजरातचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून काम करताना अमिताभ यांनी एकही रुपया मानधन म्हणून घेतला नाही.

64. लंडनमधल्या प्रसिद्ध मादाम तुसाँ या संग्रहालयात अमिताभ बच्चन यांचा मेणाचा पुतळा समाविष्ट करण्यात आलाय. हा मान मिळवणारे अमिताभ बच्चन हे आशियातले पहिले अभिनेते आहेत.

65. कौन बनेगा करोडपती हा शो अमिताभ बच्चन यांच्या करीयरमधला महत्वाचा टप्पा. पडत्या काळाता या शोने त्यांना चांगली साथ दिली. या शोसाठी अमिताभ यांचं एका दिवसाचं मानधन आहे तीन कोटी रुपये.

66.अत्यंत वादग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिग बॉस या शोचं अँकरिंगही अमिताभ बच्चन यांनी केलीय. केवळ एका सीजनपुरतीच त्यांनी ही जबाबदारी स्विकारली होती.

67. एका सिनेमासाठी अमिताभ बच्चन  तब्बल 20 कोटी रुपये मानधन म्हणून घेतात. वयाच्या पंचाहत्तरीतसुद्धा त्यांचा भाव अजिबात कमी झालेला नाही.

68. अमिताभ बच्चन यांचे मुंबईत पाच अलिशान बंगले आहेत. त्यातल्या फक्त जलसा आणि प्रतीक्षा बंगल्यांचीच किंमत 200 कोटींहून अधिक आहे.

69. जलसा हे बंगला अमिताभ यांना गिफ्ट म्हणून मिळाला होता. रमेश सिप्पी यांनी हे महागडं गिफ्ट अमिताभना दिलं होतं.

70. बिग बींचा सगळ्यात आवडता छंद म्हणजे पेन्सचं कलेक्शन करणं. हजारो प्रकारचे पेन त्यांच्या कलेक्शनमध्ये आहेत.

71. अमिताभ बच्चन यांच्या ताफ्यात 15 गाड्या आहेत. त्यात 9 कोटींची रोल्स रॉईस, साडेचार कोटींची बेंटले, दीड कोटींची पोर्शे अशा अलिशान कार्सचा समावेश आहे.

72. फोर्ब्जच्या ताज्या आकडेवारीनुसार अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 2800 कोटींच्या घरात आहे.

73. अमिताभ यांचा सुट्समधला सगळ्यात आवडता ब्रँड आहे गब्बाना. गेल्या तीस वर्षांपासून ही कंपनी अमिताभ बच्चन यांचे सुट्स डिझाईन करते आहे.

74. भारत आणि जगभरातल्या सात विद्यापीठांकडून अमिताभ यांना डॉक्टरेट देण्यात आलीय. यात इजिप्तमधल्या अॅकॅडमी अॉफ आर्ट्स आणि अॉस्ट्रेलियातल्या क्वीन्सलॅण्ड युनिव्हर्सिटीजचा समावेश आहे.

75. देश-विदेशातले शंभराहून अधिक मानाचे पुरस्कार अमिताभ बच्चन यांच्या नावावर आहेत. भारत सरकारचा पद्मविभूषण तर फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अमिताभ यांना प्रदान करण्यात आलाय.

76. बिग बी अमिताभ बच्चन हे सध्या मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी झुंड या हिंदी सिनेमात झळकणार आहे.