Bollywood villain : ही स्टोरी आहे, महानायक अमिताभ बच्चन यांच्या अनेक सिनेमात व्हिलनची  भूमिका साकारणाऱ्या दिग्गज कलाकाराची .. आता तुम्ही विचार करत असाल की हे नक्की कोण? तर सांगतो, हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक आणि स्टंटमॅन होते. त्यांनी शेकडो चित्रपटांत काम केले तसेच अनेक सुपरस्टार्सच्या फाईट सीनमध्ये ढाल बनले. मात्र एका अपघाताने त्यांना मद्यपी बनवले आणि त्यांनी स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेतले. आज बॉक्स ऑफिसवर राज्य करणारे दिग्दर्शक रोहित शेट्टी हे त्यांचेच सुपुत्र आहेत. चला तर मग एम. बी. शेट्टी यांची कहाणी जाणून घेऊ.

मुद्दू बाबू शेट्टी यांचा जन्म 1938 साली मंगळुरू येथे झाला. नंतर ते मुंबईत आले आणि छोट्यामोठ्या नोकऱ्या करू लागले. सुरुवातीला त्यांनी कॉटन ग्रीन येथे वेटर म्हणूनही काम केले. हळूहळू ते बॉक्सिंग आणि बॉडीबिल्डिंगकडे वळले आणि मग चित्रपटसृष्टीत दाखल झाले. 1956 साली हीर या चित्रपटासाठी ते पहिल्यांदा फाईट इन्स्ट्रक्टर झाले. देहयष्टी व व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना खलनायक म्हणूनही संधी मिळू लागली. हिंदीबरोबरच त्यांनी 70 च्या दशकात कन्नड चित्रपटसृष्टीतही काम केले.

700 चित्रपटांत काम

मुद्दू बाबू शेट्टी यांनी एक्शन डायरेक्टर म्हणून तब्बल 700 चित्रपटांत काम केले. डॉन, त्रिशूल, दीवार, शालीमार पासून ते अनेक साऊथ आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. केबीसीच्या एका भागात अमिताभ बच्चन यांनी त्यांची आठवण सांगितली होती. बिग बी म्हणाले होते की ते त्यांना "शेट्टी सर" म्हणत. त्यांनी अनेकदा बिग बीसाठी फाईट सीन सोपे केले होते. ते प्रत्येक अभिनेत्याची मदत करत आणि कुणावरही स्टंट करण्याचा दबाव टाकत नसत. "करणार असाल तर करा, नाही तर डुप्लिकेटला बोलावू" असे ते नेहमी म्हणत, असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले.

दोन विवाह – पाच अपत्ये

मुद्दू बाबू शेट्टी यांनी दोन विवाह केले. पहिला विवाह विनोदिनी यांच्याशी झाला होता. या विवाहातून त्यांना दोन मुली व दोन मुले झाली. दुसरा विवाह त्यांनी रत्ना यांच्याशी केला. रोहित शेट्टी हे रत्ना यांचे पुत्र आहेत. रोहितचे सावत्र भाऊ हृदय शेट्टी देखील चित्रपटसृष्टीत आले. त्यांनी दिग्दर्शक म्हणून प्लॅन, प्यार में ट्विस्ट, चाळीस चौरासी असे काही चित्रपट केले, मात्र ते रोहितसारखे प्रसिद्ध होऊ शकले नाहीत.

न झेपलेला आघात

रोहित शेट्टींची आई रत्ना या देखील एक नामांकित स्टंट लेडी राहिल्या आहेत. त्यांनी काही चित्रपटांत छोटे-मोठे रोल केले होते. एका मुलाखतीत रोहित यांनी सांगितले होते की एका अपघाताने त्यांच्या वडिलांना फार मोठा धक्का बसला होता. शत्रुघ्न सिन्हा यांचे बॉडी डबल मन्सूर एका सीनदरम्यान मृत्युमुखी पडले. हा सीन स्फोटाचा होता आणि गैरसमजामुळे हा अपघात झाला. मन्सूरच्या मृत्यूने एम. बी. शेट्टी यांना आतून हादरवले. ते उदास राहू लागले आणि त्यांनी दारूला आपलेसे केले. या धक्क्यामुळे ते एवढे खचले की घटनेनंतर केवळ एक वर्षात त्यांचे निधन झाले.

खलनायक म्हणून ओळख

एम. बी. शेट्टी यांनी स्टंटमॅन म्हणून तर काम केलेच, पण अनेक चित्रपटांत ते थेट खलनायक म्हणून झळकले. बहुतांश चित्रपटांत त्यांनी खुंखार, धूर्त खलनायकांच्या भूमिका केल्या. सीता और गीता मध्ये ते गंज्या किडनॅपरच्या भूमिकेत दिसले, तर संतो बंटो मध्ये त्यांनी कल्लू स्मगलरची भूमिका केली. अनेक स्टार्ससोबत त्यांनी काम केले आणि यशस्वी कारकीर्द ठरली.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Disha Patani News : मोठी बातमी! अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; सलमान खानला धमकवणाऱ्या गँगने घेतली जबाबदारी