Mandana Karimi: इराणच्या सर्वोच्च नेते अली खोमेनी यांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त केल्यामुळे चर्चेत आलेली इराणी अभिनेत्री मंदाना करीमी (Mandana Karimi) सध्या सोशल मीडियावर मोठ्या वादात सापडली आहे. "भारताशी ब्रेकअप करत आहे. भारताने माझा विश्वासघात केलाय. मी लवकरच इराणला परत जाणार आहे. भारतात मला सुरक्षित वाटत नाही... "असे वक्तव्य केल्यामुळे दोन दिवसांपूर्वीच या अभिनेत्रीने भारत सोडून इराणला जाण्याविषयी वक्तव्य केलं होतं. तिच्या या वक्तव्यांमुळे तिच्यावर टीकाही झाली. मात्र आता मंदानाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपल्या विधानांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ती भारत सोडून इराणला परत जाऊ शकत नाही असं तिने म्हटलं. याचे कारणही तिने तिच्या एका व्हिडिओमध्ये दिली आहेत.
10 वर्षांपासून इराणमध्ये प्रवेशबंदी
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मंदाना करीमीने सांगितले की, ती भारत सोडून इराणला जाणार असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. ती म्हणाली की, गेल्या 10 वर्षांपासून तिच्यावर इराणमध्ये बंदी आहे. त्यामुळे भारत सोडला तरी ती परत इराणला जाऊ शकत नाही.
तिने पुढे सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून भारतातून तिला कोणताही सपोर्ट मिळालेला नाही. सुरक्षेच्या कारणामुळे ती दोन महिन्यांपासून एका ठिकाणीच अडकून आहे आणि जवळच्या मित्रांपासूनही दूर राहावं लागलं आहे. इतकंच नाही तर तिचे काही कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.
माझ्या शब्दांचा विपर्यास केला...
काही माध्यमांनी आता माझ्या शब्दांचा विपर्यास करून मी भारत सोडत आहे, मी भारत सोडून कुठे जाणार याबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. होय, मी माझी नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली होती. हो, काही वेळा मला दुखावल्यासारखं आणि निराश वाटत असल्याचंही मी म्हटलं होतं. पण कोणालाही सहज समजेल की मी सध्या इराणला परत जाऊ शकत नाही. तिथे युद्ध सुरू आहे. धोका आहे आणि माझ्यावर बंदी आहे. ही काही अवघड गोष्ट नाही. पण अनेकांना ऐकण्यापेक्षा सणसणाटी मथळे बनवणं अधिक सोयीचं वाटतं. असं मंदाना करीमी म्हणाली.
इराणसाठी बोलणं थांबवणार नाही
मंदाना करीमीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, महत्त्वाचं म्हणजे इस्लामिक रिपब्लिकची खरी परिस्थिती काय आहे आणि हे शासन का संपलं पाहिजे. महत्त्वाचा आहे तो इराणमधील त्या लोकांचा आवाज, जे स्वातंत्र्यासाठी सर्वकाही पणाला लावत आहेत. जर कोणत्याही माध्यमांना हा आवाज ऐकण्याची खरोखर इच्छा नसेल तर कृपया माझा वेळ वाया घालवू नका आणि माझा देशाच्या वेदनेला नाट्य किंवा प्रचारात बदलू नका. मी इराणबद्दल आणि माझ्या लोकांबद्दल बोलणं कधीही थांबवणार नाही. आज नाही उद्या नाही कधीच नाही.
तिन म्हटलं, खरी गोष्ट आहे ती इराणमधील लोकांची अजूनही अंधारात जगत आहेत. ज्यांनी आपले जीव गमावले आहेत आणि ज्यांच्या कुटुंबांनी अनेक दशकांपासून स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आहे. अनेक मीडिया चॅनल्स माझ्याशी संपर्क साधत आहेत. मुलाखती मागत आहेत आणि माझं मत जाणून घेऊ इच्छित आहेत. पण अनेकदा असं होतंय की माझ्या बोलण्यातले काही शब्द संदर्भाशिवाय घेतले जात आहेत. संभाषण अर्धवट दाखवला जात आहे. आणि अचानक त्यावर माझ्याबद्दल सनसनाटी मथळे तयार होत आहेत.
हे माझे उद्दिष्ट कधीच नव्हतं. चर्चा माझ्या लोकांबद्दल व्हायला हवी. ते काय सहन करत आहेत याबद्दल व्हायला हवी. इराणच्या भविष्यासंदर्भात व्हायला हवी. आणि आमचे नेते रेझा शाह पहलवी यांच्याबद्दल व्हायला हवी. अनेक इराणी नागरिकांना सध्याचा शासन संपल्यानंतर देशाच्या पुनर्बांधणीची आशा त्यांच्या नेतृत्वातून दिसते. असेही ती म्हणाली.
भारत सोडण्याबद्दल काय म्हणाली?
यापूर्वी एका मुलाखतीत मंदाना करीमीने सांगितले होते की, भारतात तिला बऱ्याच काळापासून काम मिळत नाही. इराणच्या बाजूने बोलल्यामुळे तिचे काही मित्रही दूर गेले. त्यामुळे भारत सोडण्याचा विचार करत असल्याचे तिने सांगितले होते.मंदाना करीमीने बॉलिवूडमधील क्या कुल है हम 3, भाग जॉनी आणि रॉय या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र या चित्रपटांनंतरही तिला फारशी लोकप्रियता मिळाली नाही.
