मुंबई  : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याला कोरोनाची लागण झाल्यानंतर कलाविश्वात अनेकांनीच त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. रणबीरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्याची आई, नीतू कपूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. एकिकडे रणबीरची प्रकृती स्थिर असून, सध्या तो कोरोनावरील उपचार घेऊन लवकरात लवकर या विषाणूवर मात करण्याच्या प्रयत्नांत आहे. तर, त्याच्या अनुपस्थितीत प्रेयसी आलिया भट्ट हिला मात्र त्याची आठवण सतावू लागली आहे. 


आलिया भट्टनं सोशल मीडियाच्या माध्यमातून रणबीरची आपल्याला आठवण येत असल्यासंबंधीची एक पोस्ट शेअर केली. रणबीरचा हात पकडलेला एक फोटो शेअर करत तिनं याला 'मेजर मिसिंग' असं कॅप्शन दिलं आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला अडचणीत पाहून कोणाचंही मन हेलावतं. सध्या अशीच काहीशी परिस्थिती आलियाची झाली आहे. रणबीरच्या अनुपस्थितीत तिला त्याची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. 






आलियाला कोरोनाची लागण नाही... 


दरम्यान, एकिकडे रणबीरला कोरोनाची लागण झालेली असतानाच दुसरीकडे अभिनेत्री आलिया भट्ट हिच्याबद्दलही चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. पण, आपण कोरोना चाचणी केली असून, ती निगेटीव्ह आल्याचं आलियानं सांगत डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आपण पुन्हा कामाला सुरुवात केल्याचं तिनं स्पष्ट केलं. 






महाशिवरात्रीच्या निमित्तानं आलियाला जुहू येथील मुक्तेश्वर मंदिरात पाहिलं गेलं. इथं तिच्यासोबत दिग्दर्शक अयान मुखर्जीही दिसला होता.