मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput suicide) याने आत्महत्या केली आहे.  वांद्र्यातील घरी गळफास घेऊन त्यांनं आत्महत्या केल्याची माहिती आहे. सुशांत हा नैराश्यात होता अशी माहिती मिळाली आहे. आपल्या घरातील एका खोलीत त्यानं पंख्याला गळफास घेत जीवन संपवलं. काही दिवसांपूर्वी त्याच्या मॅनेजर असलेल्या दिशाने आत्महत्या केली होती.  तेव्हापासून होता डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबईतील वांद्रे येथे राहत्या घरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाच्या वृत्तानंतर त्याची अखेरची पोस्ट चर्चेत आली आहे.  सुशांतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईसोबतचा एक फोटो कोलाज करुन शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने माँ असं लिहिलं होतं. त्याची ही पोस्ट सध्या चर्चिली जात आहे. त्याच्या आईचं ब्रेन हॅमरेजमुळं निधन झालं होतं. सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. दरम्यान पोलिसांना कुठलीही सुसाईड नोट मिळालेली नाही.

'अश्रूंनी अंधुक झालेला भूतकाळ आणि हसतमुख क्षणभंगुर आयुष्य. या दोघांमधील संभाषण म्हणजे  आई", असं लिहित भावनिक पोस्ट शेअर केली होती.  सुशांत लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले होते. आईसोबत सुशांत अनेक फोटो नेहमी शेअर करत असायचा.


सुशांत सिंह राजपूतच्या कारकिर्दीला खरा ब्रेक मिळाला तो धोनीवर केलेल्या बायोपिकमधील भूमिकेनंतर. त्यांनं एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी मध्ये महेंद्रसिंह धोनीची भूमिका केली होती. सोबतच शुद्ध देसी रोमान्स, पी.के., डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी अशा सिनेमांमध्ये त्याने लक्षवेधी भूमिका निभावल्या होत्या. अभिनय क्षेत्रात त्यानं किस देश में है मेरा दिल या मालिकेद्वारे पदार्पण केले होते. तर पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे तो घराघरात पोहोचला होता.

दरम्यान या घटनेवेळी त्याचे मित्र देखील त्याच्या घरी होते. तो बाहेर येत नसल्याने मित्रांनी दरवाजा तोडला, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला.  याबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले असल्याची माहिती आहे.

करिअरच्या सुरुवातीला बॅकअप डान्सर म्हणून काम 
सुशांतनं करिअरच्या सुरुवातीला बॅकअप डान्सर म्हणून काम केलं. त्यानं फिल्मफेअर अवार्डसमध्ये अनेकदा डांस केला आहे. तिथंच त्याला बालाजी टेलिफिल्मसच्या कास्टिंग टीमने पाहिलं आणि त्याला ‘किस देश में है मेरा दिल’ नावाची मालिका मिळाली. या मालिकेत त्यानं प्रीत जुनेजा नावाची भूमिका साकारली. नंतर पवित्र रिश्ता या मालिकेनंतर त्याच्या करिअरला खरा वेग आला. त्याला डांसची फार आवड होती. त्यानंतर डांस रिअॅलिटी शो 'जरा नच के दिखा 2 आणि झलक दिखला जा 4' मध्ये सहभाग घेतला होता.

हे सुरु असतानाच त्यानं सिनेमामध्ये प्रयत्न सुरु केले. सुशांत ‘काय पो चे’ मधून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली.

सुशांतचा परिचय थोडक्यात
सुशांत सिंह राजपूतचा जन्म बिहारच्या पाटणामध्ये झाला. त्याचे वडील सरकारी अधिकारी आहेत. त्याचं कुटुंब 2000 च्या सुरुवातीला दिल्लीला स्थायिक झालं होतं. त्याचं सुरुवातीचं शिक्षण  सेंट कॅरेंस हायस्कूल पाटणामध्ये झालं तर नंतर दिल्लीच्या कुलाची हंसराज माॅडल स्कूलमध्ये तो शिकला.   दिल्लीच्या काॅलेज आॅफ इंजीनिअरिंगमधून त्यानं मॅकेनिकल इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.