Twitter War हा शब्द काही बॉलिवूडकरांसाठी किंवा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्यांसाठी नवा नाही. सध्या कलाविश्वातील दोन आघाडीच्या कलाकारांमध्ये याच माध्यमावर पुन्हा एकदा खटके उडाल्याचं पाहायला मिळत आहे. हे कलाकार म्हणजे अभिनेत्री कंगना रनौत (kangana ranaut) आणि अभिनेता दिलजीत दोसांज (diljit dosanjh).


कंगना आणि दिलजीत यांच्यात मागील काही दिवसांपासून सातत्यानं मतभेद पाहायला मिळत आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा नव्यानं भर पडली आहे. देशात सुरु असणारं शेतकरी आंदोलन आणि शेतकऱ्यांची पाठराखण करणाऱ्या दिलजील दोसांज याच्या परदेशवारीवर कंगनानं निशाणा साधला.


दिलजीतनं सोशल मीडियावर त्याच्या सुट्टीदरम्यानचे काही फोटो शेअर केले. जे पाहून कंगना संतापली आणि तिनं थेट सोशल मीडियाचाच आधार घेत जाहीरपणे त्याच्यावर निशाणा साधला. कसलाही अंदाज नसताना कंगनानं अशा प्रकारे केलेली आगपाखड पाहून दिलजीतनंही तिला सडेतोड उत्तर दिलं. ज्यानंतर या दोन्ही कलाकारांमध्ये असणारा वाद पुन्हा चर्चेचा विषय ठरला.


कंगनानं दिलजीतच्या फोटोंवर प्रतिक्रिया देत लिहिलं, व्वा भाऊ! देशात भडका उडवून, शेतकऱ्यांना रस्त्यावर आणून हे स्थानिक क्रांतिकारक परदेशात थंड वातावरणाचा आनंद लुटत आहेत. यालाच म्हणतात 'लोकल क्रांती'.








कंगनानं आपल्यावर निशाणा साधल्याचं कळताच तिला उत्तर देत दिलजीतनं ट्विट केलं, मला कळत नाही की हिला शेतकऱ्यांची काय अडचण आहे? मॅडम, संपूर्ण पंजाब शेतकऱ्यांच्या बाजूनं आहे. तुम्ही ट्विटरच्याच विश्वात जीवन जगत आहात. तुमच्याबाबत तर कोणी काही बोलतही नाहीय.


कंगना आणि दिलजीतमध्ये उडालेला हा शाब्दिक खटका इतक्यावरच थांबला नाही. कंगनानं पुन्हा उत्तर देत लिहिलं, वेळच हे स्पष्ट करेल की कोण शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढलं आणि कोण त्यांच्या विरोधात. दिलजीतला टोला लगावत त्याच्या सांगण्यावरुन पंजाबमधील नागरिक आपल्या विरोधात जातील हा भ्रम दूरच ठेव असंही ती म्हणाली. कंगनानं तोफ डागलेली असतानाच शेवटी दिलजीतनं त्याच्याच अंदाजात तिला आपली पीआर म्हणून काम सोपवण्याचं ट्विट केलं.



हिला मी PRच करु का, माझा विचारच जात नहीये हिच्या डोक्यातून. शेतकरी काही लहान मुलं नाहीत जे तुझं- माझं ऐकून रस्त्यावर येतील, असा सणसणीत टोला त्यानं लगावला. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन सुरु झालेली ही शाब्दिक खडाजंगी सोशल मीडियापासून कलाविश्वापर्यंत सगळीकडेच अनेकांच्या भुवया उंचावून गेली.