मुंबई : भाईजान, दबंग खान, यारों का यार, सल्लू, चुलबूल पांडे अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सलमान खान याच्या लोकप्रियतेविषीय नव्यानं काहीच सांगण्याची आवश्यकता नाही. मागील कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांच्या वर्तुळात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.


27 डिसेंबर 2020 म्हणजेच आज, भाईजान सलमान 55 वर्षांचा झाला. त्याच्या जीवनातील या खास दिवसाच्या निमित्तानं सोशल मीडियापासून ते अगदी त्याच्या घराबाहेरील परिसरापर्यंत आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आता तुम्ही म्हणाल यंदाच्या वर्षी सलमानचा वाढदिवस नेमका कसा साजरा केला जाणार?


तर, मागील काही दिवसांपासून सलमान त्याच्या पनवेल येथी फार्महाऊसवरच आहे. तिथच त्यानं 55 व्या वाढदिवसाचा केकही कापल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर माध्यमांच्या काही प्रतिनिधींनी या क्षणांचे फोटो आणि व्हि़डिओही पोस्ट केले. ज्यामध्ये सलमान माध्यमांसमोर येत केक कापताना दिसत आहे. यावेळी काही मंत्री आणि सेलिब्रिटी मित्रांनी सलमानला थेट त्याच्या फार्महाऊसवर जाऊन शुभेच्छा दिल्या.


कोरोनाच्या संकटाची चाहूल लागताच पुढं सावधगिरी म्हणून राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर काही मित्रमंडळी आणि कुटुंबीयांच्या साथीनं सलमाननं पनवेलचं फार्महाऊस गाठलं. सोशल मीडियावरील त्याच्या माहील काही महिन्यांतील पोस्ट पाहिल्या असता तो इथं नेमकं कसं आयुष्य व्यतीत करत होता याचा सहज अंदाज येत आहे.








दरम्यान, यंदाच्या वर्षी सलमानचा वाढदिवस काहीसा वेगळा असला तरीही त्याला मिळणारं चाहत्यांचं प्रेम आणि आपुलकी त्याचा हा दिवस नक्कीच खास करतील यात शंका नाही. चाहतेच नव्हे तर सेलिब्रिटी वर्तुळातूनही या अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशा या (Salman Khan) सलमान खानला एबीपी माझाकडूनही वाढदिवसाच्या शुभेच्छा