मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 90 जागा मिळाल्या आहेत. तर, भाजप 137 जागांवर निवडणूक लढवत आहे. मुंबई महापालिकेच्या सदस्यांची संख्या 227 इतकी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. राजकीय पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी बंडखोरी केली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपात वॉर्ड क्रमांक 25 भाजपकडे गेला. भाजपनं या ठिकाणी अभिनेत्री निशा परुळेकर यांना उमेदवारी दिली. मात्र, यामुळं नाराज झालेल्या शिवेसनेच्या शेखर शेरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यामुळं निशा परुळेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
निशा परुळेकरांविरोधात सेनेच्या शेखर शेरेंची बंडखोरी
मागाठाणे विधानसभेमध्ये शिवसेना भाजप आमने-सामने आल्याचं पाहायला मिळतंय. भाजपकडून वॉर्ड क्रमांक 25 मधून निशा परुळेकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, याच वॉर्डात शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते शेखर शेरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेच्या शेखर शेरे यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या परुळेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Nisha Parulekar: कोण आहेत अभिनेत्री निशा परुळेकर?
अभिनेत्री निशा परुळेकर या प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपट व नाटकांमध्ये लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. भरत जाधव यांच्यासोबत ' सही रे सही' यासारख्या तुफान नाटकात त्यांनी काम केलं आहे. तसेच महानायक व शिमणा या दोन चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. शिवाय महेश कोठारे व्हिजन निर्मित दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेत त्यांनी महालक्ष्मी अंबाबाईचे पात्र साकारले होते. अभिनयाच्या क्षेत्रात अनेक वर्ष काम केल्यानंतर त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतला आहे. रंगमंचावर, तसेच मोठ्या व छोट्या पडद्यावर प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर आता अभिनेत्री निशा परुळेकर राजकारणाच्या रिंगणात नशीब आजमावणार आहेत. अभिनेत्री निशा परुळेकर यांना प्रभाग क्रमांक 25 मधून उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे. भाजपकडून त्या महापालिकेच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजप सांस्कृतिक प्रकाशच्या सहसंयोजक म्हणून सध्या त्या भाजपमध्ये काम करत आहेत.
बंडखोरी शमवण्यासाठी भाजपची रणनीती
बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपनं वेगळी रणनीती राबवली आहे. मुंबईतील जिल्हाध्यक्षांकडून बंडोबांची यादी मागवली जाणार आहे. केंद्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांची मुंबईच्या नेत्यांसोबत बैठक होणार आहे. अर्जाची मुदत संपल्यानंतर मुंबईतील बंडोबांचा संपूर्ण आढावा घेतला जाणार आहे. बंडखोरांना संपर्क करण्यासाठी स्थानिक नेतृत्वांना सूचना देण्यात आली आहे, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.