Kangana Ranaut On Amit Shah: संसदेत (Sansad Bhavan) एका विधेयकावरुन जोरदार गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालेलं. 130 व्या घटना दुरुस्ती विधेयकाला बुधवारी लोकसभेत जोरदार विरोध पाहायला मिळाला. विरोधकांनी विधेयकाच्या मसुद्याच्या प्रती फाडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे (Union Home Minister Amit Shah) भिरकावल्या. आता याच मुद्द्यावरुन अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत (BJP MP Kangana Ranaut) यांनी खळबळजनक आरोप केला आहे. विरोधकांनी फक्त कागदच नाहीतर, गृहमंत्री अमित शहांवर दगडही फेकले, असा धक्कादायक आरोप मंडी येथील भाजप खासदार कंगना रनौत यांनी केला आहे. 

Continues below advertisement


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत तीन विधेयकं सादर केली. यादरम्यान सभागृहात बराच गोंधळ पाहायला मिळाला. केंद्रातील मोदी सरकार या विधेयकांद्वारे संविधानातील 130 वी दुरुस्ती करणार आहे. या दुरुस्तीअंतर्गत, गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली 30 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांना त्यांच्या पदांचा राजीनामा द्यावा लागेल, अशी तरतूद करण्यात आलेली. 


मोदी सरकारनं मांडलेल्या विधेयकाला विरोधकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की, हे संविधानाचं उल्लंघन आहे. सभागृहात विधेयक सादर करताना धक्काबुक्कीच्याही बातम्या येत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.


भाजप खासदार कंगना रानौत आज तकशी बोलताना म्हणाल्या की, "गृहमंत्री विधेयक मांडत असताना विरोधी पक्षनेते वेलमध्ये आले आणि त्यांनी गृहमंत्री अमित शहांवर टीकेची झोड उठवली आणि विधेयकाच्या प्रती फाडून त्यांच्या तोंडावर फेकल्या. केवळ कागदच फेकले गेले नाही, तर अमित शहांवर दगडफेकही करण्यात आली. कल्पना करा की, ते आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांचा माईक तोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. तिथे उपस्थित असलेल्या महिलांनी त्यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली."






कंगना रनौत म्हणाल्या की, "विरोधी पक्षांचे खासदार ज्या पद्धतीनं हिंसाचार करत होते, त्या वेळी आमच्या पक्षाच्या नेत्यांनी खूप संयमानं संपूर्ण परिस्थिती हाताळली, परंतु संसदेत हे किती काळ चालू राहील, ही खूप चिंतेची बाब आहे..."


लोकसभेत नेमकं घडलं काय? 


बुधवारी राज्यभरात एकीकडे पावसानं धुमाकूळ घातलेला असताना देशाच्या संसदेत एका विधेयकामुळे राजकीय वादळ पाहायला मिळालं. 130 व्या घटना दुरुस्ती विधेयकाला आज लोकसभेत जोरदार विरोध पाहायला मिळाला. विरोधकांनी विधेयकाच्या मसुद्याच्या प्रती फाडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे भिरकावल्या. त्यांनतर काँग्रेसचे खासदार के.सी.वेणुगोपाल यांनी अमित शाहांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. गुजरातचे गृहमंत्री असताना शाहांना अटक झाली होती, असं वेणुगोपाल म्हणाले. त्यावर शाहांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं. माझ्यावर खोटे आरोप झाले होते. त्यावेळी अटक होण्याआधीच मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचं शाहांनी लोकसभेत स्पष्ट. खोट्या गोष्टी रेकॉर्डवर आणू नका, असं म्हणत शाहांनी विरोधकांना खडसावलं.


दरम्यान, या नव्या विधेयकात भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना जेलवारी करण्याची तरतूद या विधेयकात आहे. तसंच कोणत्याही आरोपाखाली सलग 30 दिवस तुरुंगात राहिलेल्या मंत्र्याला 31 व्या दिवशी मंत्रीपदावरुन हटवण्याची तरतूद विधेयकात आहे. विशेष म्हणजे, या कायद्याच्या परिघात पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री हे पण असतील. या विधेयकाला काँग्रेस, एमआयएम आणि सपानं जोरदार विरोध केलाय. संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या पायाला धक्का लावणारं हे विधेयक असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sumeet Raghavan On Poor Road Conditions: 'रस्त्यावरची कुत्री, कबुतरं यांपेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी आहेत देशात...'; गडकरी-फडणवीसांना टॅग करुन मराठमोळ्या अभिनेत्यानं व्यक्त केला संताप