Bigg Boss marathi 6: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असताना, आता एका महत्त्वाच्या घडामोडीमुळे ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अभिनेता रितेश देशमुख नुकताच ‘बिग बॉस 19’च्या मंचावर झळकला असून, मराठी बिग बॉसबाबतची मोठी घोषणा याच व्यासपीठावर होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. (Bigg Boss Marathi 6)

Continues below advertisement

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी 6’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वर्षीची थीम दरवाजांवर आधारित असल्याचं बोललं जातंय. कोणाच्या आयुष्यात  कोणते नवीन दरवाजे उघडतील, कोणाची नशिबाची किल्ली लागेल हे नक्कीच मनोरंजक ठरणार आहे. मात्र, या सगळ्यांपेक्षा मोठा प्रश्न होता की या सीझनचा होस्ट कोण असेल? बिग बॉसच्या मंचावर हजेरी लावल्यामुळे आता जवळपास खात्री पटली आहे.रितेश देशमुखच सुत्रसंचालन करणार! या तर्कांना अधिक बळ मिळालं ते बिग बॉस हिंदीने शेअर केलेल्या प्रोमोमुळे. या प्रोमोमध्ये सलमान खान स्वतः रितेशचे मंचावर स्वागत करताना दिसत आहे. त्यानंतर रितेश स्पर्धकांसोबत काही गेम्सही खेळतोय. त्याचा प्रवेश पाहूनच प्रेक्षकांना जाणवलं ही एंट्री साधी नाही.

याच दरम्यान कलर्स मराठीनेही सलमान खानचा फोटो आणि त्याच्या शेजारी एका दुसऱ्या व्यक्तीची छाया असलेली पोस्ट शेअर केली होती. कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. “आज रात्री मिळणार एक लय भारी अपडेट. पाहायला विसरू नका हिंदी बिग बॉस.” या सूचक पोस्टमुळेच चर्चांना आणखी उधाण आलं.

तसंच कलर्स मराठीने एक फोटोशूट प्रोमोही प्रसिद्ध केला आहे. त्यात चेहरा स्पष्ट नसल्यानं ‘तो कोण?’ यावर तर्क वितर्क झाले, पण चाहत्यांनी आवाज, अंदाज आणि पोश्चरवरून हा रितेशच असल्याचा ठाम अंदाज व्यक्त केला. आता खरी उत्सुकता आहे, रितेश हिंदी बिग बॉसच्या मंचावर नेमकी कोणती घोषणा करणार?अनेकांच्या  मते,‘वीकेंड का वार’मध्ये बिग बॉस मराठी 6 ची अधिकृत तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

हिंदी बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्याची तारीख अद्याप स्पष्ट नाही. मात्र पुढील आठवडा अंतिम टप्प्यात असण्याची शक्यता असल्याने, 7 डिसेंबरला बिग बॉस 19 संपेल असं मानलं जातंय. आणि त्यानुसार बिग बॉस मराठी सिझन  6 येत्या 8 डिसेंबरपासून सुरू होऊ शकतो, असा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला आहे.