Bigg Boss Marathi Season 6 : मराठी प्रेक्षकांचा आवडता रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या शोचा सहावा सीझन येत्या 11 जानेवारी 2026 पासून सुरू होणार असून, अभिनेता रितेश देशमुख यावेळीही सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. शो सुरू होण्यास अजून 6 दिवस बाकी असतानाच, घरात कोणते चेहरे पाहायला मिळणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.(Bigg boss marathi season 6)

यंदाच्या सीझनमध्ये केवळ कलाकारच नव्हे, तर सोशल मीडिया विश्वातील लोकप्रिय चेहरे, लावणी नृत्यांगना आणि राजकीय पार्श्वभूमी असलेले सेलिब्रिटीही सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बिग बॉस मराठी 6 अधिक धमाकेदार ठरणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे

कोणाच्या नावाची चर्चा?

गेल्या काही आठवड्यांपासून अनेक नावं बिग बॉस मराठी 6 साठी चर्चेत आहेत. अभिनेता डॅनी पंडित, अथर्व रुखे, अथर्व सुदामे, लावणी कलाकार गौतमी पाटील, वकील गुणरत्न सदावर्ते, अनुश्री माने, अभिनेता आकाश नलावडे, मॉडेल सोनाली राऊत, विनायक माळी, गौरव मोरे, धनश्री कडगावकर आणि गिरिजा ओक यांचाही या यादीत समावेश होता. मात्र या सर्व नावांबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

कोणाची एन्ट्री जवळपास पक्की?

ईटाइम्सच्या वृत्तानुसार, काही निवडक सेलिब्रिटींची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडे, लोकप्रिय मालिका अभिनेता संकेत पाठक, सोशल मीडिया स्टार अनुश्री माने, अभिनेत्री व राजकारणात सक्रीय असलेली दिपाली सय्यद, लावणी नृत्यांगना राधा मुंबईकर आणि अभिनेत्री रसिका जामसुदकर यांचा बिग बॉस मराठी 6 मध्ये प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे.

मागील सीझनचा यशस्वी प्रवास

दरम्यान, बिग बॉस मराठी 5 मध्ये कंटेंट क्रिएटर आणि अभिनेता सूरज चव्हाण याने विजेतेपद पटकावले होते. गायक अभिजीत सावंत या स्पर्धेचा उपविजेता ठरला होता. 6 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडलेल्या अंतिम सोहळ्यात सूरजने ट्रॉफीसह 14.5 लाख रुपयांचे रोख बक्षीस जिंकले होते. या यशानंतर सूरजच्या करिअरला नवे वळण मिळाले आणि त्याला केदार शिंदे यांच्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली. आता बिग बॉस मराठी 6 मध्ये कोण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आणि कोण खेळावर अधिराज्य गाजवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.