Colors Marathi Bigg Boss Marathi 7: कलर्स मराठीवरील लोकप्रिय शो 'बिग बॉस मराठी 7' (Bigg Boss Marathi7) आता पुन्हा सुरू होणार आहे. सहाव्या सिझननंतर प्रेक्षकांना नव्या सिझनची प्रचंड आतुरता आहे. पण नव्या सिझनच्या आधीच 'बिग बॉस मराठी 7' च्या मेकर्सनी प्रेक्षकांना सावध केलं आहे. खरंतर बिग बॉस मराठीमध्ये गेल्या सिझनमध्ये अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सहभागी झाले होते त्यामुळे यंदाच्या सिझनसाठी कोणाला बिग बॉसच्या घरात आमंत्रित केलं जाणार याकडे प्रेक्षकांसह इन्फ्लुयन्सरर्सही वाट पाहत आहेत. 'बिग बॉस'मधून कुणाला आमंत्रणाचा कॉल जाणार? किंवा ईमेल जाणार? याविषयी कुतूहल निर्माण झालेले असताना अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत असल्याने मेकर्सकडून प्रेक्षकांना आणि बिग बॉसच्या चाहत्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. 'बिग बॉस मराठी'च्या नावाने सुरू असलेल्या अनेक बनावट कास्टिंग प्रक्रिया, फसवे दावे, पैसे उकळण्याचे प्रकार घडत असल्याचं लक्षात आल्यानंतर 'बिग बॉस मराठी'ने एक सूचनापत्र त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरची सध्या एकच चर्चा आहे.
काय म्हटलंय या सूचना पत्रकात?
बिग बॉस मराठीचा मेकर्सने प्रेक्षकांना सावध करत एक पोस्ट लिहिली आहे त्यात त्यांनी म्हटलंय ' महत्त्वाची सूचना .बिग बॉस मराठी 7 च्या नावाखाली सुरू असणाऱ्या बनावट कास्टिंग प्रक्रिया, फॉर्म, किंवा फसव्या दाव्यांपासून सावध राहा. अधिकृत माहितीसाठी फक्त आमच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरच विश्वास ठेवा.सतर्क रहा. सुरक्षित रहा.'
बिग बॉस मराठीच्या कास्टिंगसाठी कधीही कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरून घेतला जात नाही. या कार्यक्रमाची कास्टिंग प्रक्रिया अतिशय गोपनीय आणि अधिकृत पद्धतीने केली जाते. कृपया कोणत्याही बनावट कास्टिंग कॉल, फॉर्म, किंवा पैशाची मागणी करणाऱ्या व्यक्ती किंवा एजन्सीवर विश्वास ठेवू नका.कृपया या बाबीची नोंद घ्यावी, आणि सतर्क रहावे. ' असे सूचना पत्रक बिग बॉस मराठीच्या सातव्या सीझनच्या संदर्भात मेकर्सने केली आहे.
