Bigg Boss Marathi :‘बिग बॉस मराठी’ सिझन 6 मध्ये नॉमिनेशन टास्क सुरू होताच घरातील शांतता पार मोडली आहे. पहिल्याच नॉमिनेशन प्रक्रियेत सदस्यांमधील लपलेले मतभेद उघडकीस येताना दिसत असून, रणनीती आणि आरोप-प्रत्यारोपांनी खेळाला वेगळंच वळण मिळालं आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सागर कारंडे आणि तन्वी यांच्यात रंगलेला तीव्र वाद प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. एकमेकांवर थेट आरोप, तिखट शब्दांची देवाणघेवाण आणि वाढता तणाव यामुळे घरातील वातावरण तापलेलं स्पष्ट दिसत आहे. नॉमिनेशनच्या भीतीने उफाळलेला हा संघर्ष पुढे खेळाचं गणित बदलणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे.
सागर कारंडेवर तन्वीने डागली तोफ
प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, पहिल्या नॉमिनेशन' टास्कदरम्यान तन्वीने सागर कारंडेचा फोटो असलेली पतंग कापली आहे. इतकंच नाही तर, "सागर कारंडे या शोसाठी अपात्र आहेत" असं खळबळजनक विधान तिने केलं आहे. तन्वीच्या या भूमिकेमुळे सागर प्रचंड संतापलेला पाहायला मिळाला.
"एवढी तर अक्कल पाहिजे!" सागरचा तन्वीला उत्तरं"
तन्वीच्या आरोपांना उत्तर देताना सागर म्हणाला, "एवढी तर अक्कल पाहिजे की आपण काय बोलतोय!" यावर तन्वीनेही माघार न घेता "मी नॉनसेन्स आहे, तुम्ही बोलायची गरज नाही" असं ठणकावून सांगितलं. वादाच्या भरात सागरने तिला मध्ये न बोलण्याचा इशारा दिला आणि सांगितले, मी तुला आधीच म्हटले होते मी बोलताना मध्ये बोलायचे नाही. ज्यावर तन्वीने "मी तुझ्या आवाजाला घाबरत नाही, तू मला शिकवणार" असं सडेतोड उत्तर दिलं आहे.
ही घरातील नवी रणनीती?
नेहमी शांत राहणारा सागर आणि आक्रमक तन्वी यांच्यातील हा वाद घराला कोणत्या वळणावर नेणार, हे पाहणं रंजक ठरेल. नॉमिनेशनच्या भीतीपोटी हे सदस्य एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत का?असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. या वादाचे परिणाम काय होतील, हे पाहण्यासाठी, कोण होणार नॉमिनेटेड ? आणि कोण होणार सेफ ? जाणून घेण्यासाठी पहा 'बिग बॉस मराठी' सिझन ६, आज रात्री ८:०० वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही JioHotstar वर!