Bigg Boss Marathi 6: कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या वादाची ठिणगी पडली आहे. नेहमी शांत आणि 'चिल' राहणारा अभिनेता राकेश बापट आज चांगलाच संतापलेला पाहायला मिळणार आहे. निमित्त ठरलं आहे ते म्हणजे अनुश्री माने हिचं वागणं. घरात बेडवरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की राकेशने थेट घर सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अनुश्रीच्या काही विधानांमुळे राकेशचा पारा चढला आणि त्याने तिला कडक शब्दात सुनावले. या वादात घरातील इतर सदस्यही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, मात्र राकेशचं डोकं चांगलंच गरम झालं आहे.
राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात वादाची ठिणगी
घरातील वातावरणात तणाव निर्माण झाला जेव्हा अनुश्री आक्रमकपणे म्हणाली, "मला कोणीही माझ्या बेडवरून हलवू शकत नाही." तिने पुढे राकेशला उद्देशून म्हटले, "जिथे तू हात धरून मला उठवलंस ना, तिथेच माझ्या डोक्यात गेलास तू." अनुश्रीचं हे बोलणं ऐकून राकेशचा संयम सुटला. तो संतापून म्हणाला, "हे बोलणं चुकीचं आहे. Do not dare to say that again. आयुष्यात मी 25 वर्षं एवढं काम केलं आहे, कोणाची हिंमत आहे की मला असं कोणी बोलेल?" या वादाने इतकं गंभीर वळण घेतलं की राकेश चिडून ओरडला, "मला या घरात आता थांबायचं नाहीये!" आणि तो तिथून निघून गेला. आता हा वाद निवळणार की राकेश खरोखरच घर सोडणार? हे पाहण्यासाठी पहा ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6 - दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि कधीही JioHotstar वर.
खेळाचा प्रत्येक टप्पा सदस्यांसाठी आव्हानात्मक ठरत असतानाच, आता घरात एका अशा गोष्टीची एन्ट्री होणार आहे ज्यामुळे संपूर्ण गेमच बदलून जाणार आहे. आजच्या भागात प्रेक्षकांना एक मोठा बदल पाहायला मिळेल. घरामध्ये आता 'उल्टा-पुल्टा' रूमचं दार उघडणार आहे. या रूममध्ये अशी ताकद आहे की ती संपूर्ण खेळाचा नूर पालटून टाकू शकते. 'या आठवड्यात सदस्यांचं ट्रबल होणार डबल' असं म्हणत बिग बॉसने सदस्यांना इशाराच दिला आहे. बिग बॉस यांनी सदस्यांना सांगितले, " या रूममध्ये ताकद आहे अख्खा गेम उल्टा-पुल्टा करून टाकण्याची." कोणाचे कोणाशी असलेले नाते बिघडणार? कोणाचा खेळ मजबूत होणार? तर कोणाच्या अडचणी वाढणार? काही सदस्यांसाठी ही रूम संधी ठरणार की संकट, हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल.