Bigg Boss Marathi 6 Host: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 6) सिझन 6 च्या टीझरनं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलंय. त्यानंतर शोचे प्रेक्षक अजून एका मोठ्या घोषणेची आतुरतेनं वाट बघत होते आणि ती म्हणजे, यंदाच्या बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचं सूत्रसंचालन कोण करणार? प्रेक्षकांची एकच मनापासून इच्छा होती की या वर्षीही भाऊ म्हणजेच, रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांनीच हा सीझन होस्ट करावा. आणि अखेर ही इच्छा पूर्ण झाली ती थेट बिग बॉस हिंदीच्या भव्य मंचावर! 

Continues below advertisement


सर्वांचा लाडका भाईजान म्हणजेच, सलमान खान (Salman Khan) यांनी या वर्षाची सर्वात मोठी घोषणा करत रितेश देशमुख यांचं खास स्वागत केलं आणि जाहीर केलंय की, बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचं सूत्रसंचालन रितेश देशमुख करणार आहे. भाईकडून भाऊची अशी स्टाईलमध्ये ओळख करून देणं हा क्षण प्रेक्षकांसाठी भावनिकही होता आणि अभिमानास्पदही. देशभरातील प्रेक्षकांच्या आवडीचे दोन सुपरस्टार्स एकाच मंचावर, एकाच क्षणी एकमेकांना शुभेच्छा देताना पाहून चाहत्यांना आनंद झाला.


सलमान खाननं रितेश देशमुखचं प्रेमानं आणि दबंग स्टाईलनं 'बिग बॉस हिंदी'च्या मंचावर स्वागत केलं, 'बिग बॉस नंतर देखील एंटरटेनमेंट सुरूच राहणार आहे, कारण लवकरच 'बिग बॉस मराठी' सुरू होणार आहे आणि तो घेऊन येणार आहे, माझा लाडका भाऊ रितेश देशमुख. भाऊ तू देशाचा खूप मोठा प्रॉब्लेम solve केला आहेस, 'बिग बॉस हिंदी' संपल्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी तू घेतली आहेस. यावेळेस नवीन काय असणार आहे...?", असं सलमान खान म्हणाला. 






रितेश देशमुख म्हणाला की, "पहिलं तर तुम्हाला ब्लॉकब्लस्टर सिझनसाठी खूप शुभेच्छा. मी रोज बघतोच आहे, सगळ्यांना देखील हा सिझन खूप आवडतो आहे. यावेळेस मराठी सिझनमध्ये आपण एका दरवाज्यातून सदस्यांचे स्वागत करतोच पण आता आत गेल्यानंतर खूप दरवाजे त्यांचे स्वागत करणार आहेत. प्रत्येक दरवाज्यामागे काहीतरी लपलेलं असणार आहे. काहीवेळेस चांगल्या गोष्टी असतील, काहीवेळेस shocking गोष्टी असतील. म्हणजेच दरवाज्यामागे काही ना काही असणार आहे."


सलमान खाननं मागील सीझनचं देखील कौतुक केलं आणि येणाऱ्या सिझनसाठी शुभेच्छा दिल्या. याचसोबत रितेश देशमुख यांनी एक एलिमेनेशन देखील केलं, सदस्यांसोबत संवाद देखील साधला. याचसोबत सलमान खान असं देखील म्हणाला की, हा नवा सिझन मी नक्की बघणार. 


सोशल मीडियावर सलमान–रितेश यांच्या मंचावर एकत्र येण्याने उत्साहाचं वातावरण निर्माण केलं आहे. सगळीकडे एकच चर्चा आहे बिग बॉस मराठी आणि रितेश देशमुख... दोन सुपरस्टार्स एकाच मंचावर, एकाच क्षणी भेटताच प्रेक्षकांचा जल्लोष उसळला आणि आता एकच वाक्य ऐकू येत आहे "दार उघडणार… नशिब पालटणार… भाऊ येणार!" बिग बॉस मराठीचा हा सिझन वाजणार. तेव्हा बिग बॉस मराठी सिझन 6 लवकरच परततोय आपल्या कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर.