Bigg boss marathi season 6: मराठी मनोरंजनाची ओळख बनलेला आणि ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र आतुरतेने पाहतो असा मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात भव्य आणि चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ पुन्हा एकदा नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6 चे दणक्यात पुनरागमन होत असून, देशाचा लाडका सुपरस्टार आणि मराठी प्रेक्षकांचा ‘भाऊ’ रितेश देशमुख यंदाही सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. हा शो 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वाजता, कलर्स मराठी आणि JioHotstar वर प्रसारित होणार आहे.
नव्या घरात नवा खेळ
यंदा ‘बिग बॉस मराठी’चं घर नव्या रूपात, नव्या रचनेत आणि नव्या खेळाच्या नियमांसह सादर होत आहे. “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” या रोमांचक थीमसह घर सज्ज असून, प्रत्येक दारामागे एखादं आव्हान, धक्का किंवा नशीब बदलणारा क्षण दडलेला असेल.
100 दिवसांचा थरार
100 हून अधिक कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत, तब्बल 100 दिवस चालणाऱ्या या प्रवासात अतरंगी स्वभावांचे बहुरंग, नात्यांचे बदलते पदर, प्रेम, मैत्री, मतभेद, भांडणं आणि चुरशीचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सूत्रसंचालनाची धुरा पुन्हा रितेश भाऊंकडे
बिग बॉसच्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यातील दुवा म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक. मागील पर्वात आपल्या ठाम मतांमुळे, रोखठोक भूमिका आणि प्रेमळ स्वभावामुळे प्रेक्षकांची मने जिंकणारे रितेश देशमुख याही पर्वात ही महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. कधी मित्र, कधी मार्गदर्शक, तर कधी कठोर शिस्तीच्या भूमिकेत त्यांनी सदस्यांना आरसा दाखवला होता. हे सगळं यंदाही पाहायला मिळणार आहे.
रितेश देशमुख म्हणाला,“‘बिग बॉस मराठी’चं घर म्हणजे रोज नवं वळण आणि नवं आव्हान. पुन्हा एकदा या शोचं सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. यंदा कुठलं दार कुणाचं नशीब उघडेल हे कुणालाच माहीत नाही. या सीझनमध्ये राडा, भावना, मस्ती आणि धक्के सगळं काही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.”
16 हून अधिक स्पर्धक, एकच विजेता
यंदा 13,000 चौरस फूट भव्य घरात विविध क्षेत्रातील 16 हून अधिक लोकप्रिय व्यक्तिमत्त्वे, सदस्य म्हणून सहभागी होणार आहेत. दर आठवड्याला किमान एका स्पर्धकाचं नामांकन करण्यात येईल आणि अंतिम फेरीपर्यंत टिकणारा स्पर्धक ठरेल ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6 चा विजेता.
यंदा 21 ते 55 वयोगटातील स्पर्धक दिसणार घरात
दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले, “मराठी प्रेक्षक अतिशय चोखंदळ आहेत. त्यामुळे सहाव्या सीझनसाठी आम्ही फक्त खेळ नाही, तर संपूर्ण अनुभव नव्याने घडवण्याचा निर्णय घेतला आहे. 21 ते 55 वयोगटातील विविध विचारसरणीचे स्पर्धक यंदा घरात पाहायला मिळणार आहेत.”
कधी आणि कुठे पाहाल?
बिग बॉस मराठी’ सहावे पर्व 11 जानेवारी 2026 पासून दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि JioHotstar वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.