Bigg Boss Kannada 12 Studio Gets Closure: कर्नाटकातील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस कन्नड 12'च्या चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी आहे. कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळानं शोचा स्टुडिओ तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या, 'बिग बॉस कन्नड 12'चं शुटिंग स्टुडिओमध्ये सुरू होतं, पण आता कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळानं शोचा स्टुडिओ तात्काळ बंद करण्याचे आदेश दिल्यामुळे स्टुडिओ तात्काळ बंद करावा लागेल, ज्यामुळे रिअॅलिटी शोच्या शुटिंगवर परिणाम होणार आहे. 

Continues below advertisement

कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळानं (केएसपीसीबी) रामनगर जिल्ह्यातील बिदादी औद्योगिक क्षेत्रात स्थित मेसर्स वेल्स स्टुडिओज अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ज्याला पूर्वी जॉली वुड स्टुडिओज अँड अ‍ॅडव्हेंचर्स म्हणून ओळखलं जात होतं, तो तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई जल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा, 1974 च्या कलम 33(अ) अंतर्गत करण्यात आली आहे.

'बिग बॉस कन्नड 12'चं घर का बंद होणार? 

केएसपीसीबीनं हा निर्णय स्टुडियोकडून अनेक नियमांचं उल्लंघन केल्यानंतर घेण्यात आला आहे. यामध्ये मुख्यतः वैध परवान्यांशिवाय काम करणं, प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावणं आणि अयोग्य कचरा व्यवस्थापन (Disposal Of Untreated Wastewater And Inappropriate Waste Management) यांचा समावेश आहे. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्टुडिओनं नियमांचं उल्लंघन केलंय आणि अनेक तपासणी आणि इशारा देण्यात आलेला असूनही प्रदूषण करत राहिले आहेत. अशा परिस्थितीत, स्टुडिओ बंद करणं हा एकमेव शेवटचा उपाय होता.                                                    

Continues below advertisement

शोच्या चित्रीकरणात येऊ शकतो व्यत्यय... 

'बिग बॉस कन्नड सीझन 12'चं चित्रीकरण सध्या जॉली वुड स्टुडिओमध्ये सुरू आहे. केएसपीसीबीच्या आदेशामुळे शोचं चित्रीकरण विस्कळीत होण्याची शक्यता आहे. बोर्डानं स्टुडिओ तात्काळ बंद करण्याचे, रामनगर उपायुक्तांना स्टुडिओ परिसर सील करण्याचे आणि बेस्कॉमला तात्काळ वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत.                                                    

प्रदूषण आणि उल्लंघन रोखण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं केएसपीसीबीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, स्टुडिओनं बोर्डानं ठरवलेल्या पर्यावरणीय मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलेलं नाही आणि बेकायदेशीरपणे शो चालवणं सुरूच ठेवलं.