Bhojpuri Singer Nisha Upadhyay Slaps Anchor On Stage: सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध गायिकेचा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे, ज्यानं अक्षरशः सर्वांना हैराण करुन सोडलं आहे. हा व्हिडीओ आहे एका सुप्रसिद्ध गायिकेचा. भर कार्यक्रमात ही गायिका अँकरच्या मागे चप्पल घेऊन लागल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. आधी हा व्हिडीओ पाहून सर्वांचा गोंधळ उडतो. त्यानंतर मात्र, त्या कार्यक्रमात घडलेला धक्कादायक प्रकार सर्वांसमोर येतो. 

मनोरंजन सृष्टीतील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. भोजपुरी गायिका निशा उपाध्याय (Bhojpuri Singer Nisha Upadhyay) एका लाईव्ह स्टेज शो दरम्यान अचानक संतापली. परिस्थिती इतकी बिकट झाली की, तिनं स्टेजवरील अँकरला मारण्यासाठी तिनं तिची सँडलही काढली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि आता ती वेगानं व्हायरल होत आहे.

खरं तर, कार्यक्रमादरम्यान, अँकरनं निशाच्या मानधनावरुन एक अश्लील टिप्पणी केली, ज्यामुळे गायिकेचा पारा चढला आणि राग अनावर झाल्यामुळे तिनं थेट चप्पल काढून अँकरच्या मागे धाव घेतली. या घटनेमुळे भोजपुरी इंडस्ट्रीच्या लाईव्ह शोमध्ये वाढत्या अश्लीलतेबद्दल आणि कलाकारांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं घडलंय काय? 

निशा उपाध्यायचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सारण जिल्ह्यातील एका कार्यक्रमातील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये लोक स्टेजवर जमल्याचं पाहायला मिळतंय. गायिका निशा उपाध्याय हातात चप्पल घेऊन संतापलेली दिसतेय. ती अँकरला मारण्यासाठी धावतेय आणि तिच्यासोबत असलेले लोकही संतापल्याचं पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर लोक निशाच्या कृतीचं कौतुक करत आहेत आणि असं म्हणत आहेत की, गैरवर्तन करणाऱ्यांना असा धडा शिकवलाच पाहिजे.

ही घटना बिहारमधील सारण जिल्ह्यात घडली, जिथे स्टेजवर गर्दी होती. अचानक कार्यक्रमादरम्यान वातावरण बिघडलं आणि निशा उपाध्याय अचानक संतापली. त्यानंतर तिनं हातात सँडल घेऊन अँकरवर हल्ला केला. तिच्या टीमचे सदस्यही संतापल्याचं पाहायला मिळालं आणि जवळून येणाऱ्यांनी स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मीडिया रिपोर्टनुसार, कार्यक्रमादरम्यान, अँकरनं गायिकेच्या मानधनाबाबत बोलताना 'रेट' असा शब्द वापरत आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यानं तिला स्टेजवरून 'तुझा रेट काय आहे...?', असं विचारलं. याच प्रश्नावर गायिकेच्या रागाचा पारा चढला आणि ती संतापली.

प्रकरण नेमकं काय? 

गायिका निशा उपाध्यायनं गर्दीच्या स्टेजवरून आरोप केला की, अँकर तिचा रेट विचारत आहे. हे ऐकून निशा संतापली. हा व्हिडीओ 'द बिहार' या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आला. त्यात लिहिलंय की, "भोजपुरी गायिका निशा उपाध्याय यांनी गर्दीच्या स्टेजवर अँकरला चप्पलनं मारलं. आरोप असा आहे की, अँकर निशा उपाध्यायचा रेट विचारत होता. भोजपुरी स्टेज शो आजकाल सॉफ्ट पॉर्न बनले आहेत, जिथे अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जातात. सरकार डीजेवर बंदी घालत आहे, पण अश्लील स्टेज शोबद्दल काहीही बोलत नाही..."