Bhojpuri Singer Dhananjay Sharma: भोजपूरी इंडस्ट्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी गाण्यामुळे तर कधी चित्रपटातील सीन किंवा शीर्षकामुळे चर्चेत असते. परंतु, या चर्चा अनेकदा वादग्रस्त ठरतात. भोजपूरी कलाकारांचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात. सध्या एका व्हिडिओने सोशल मीडियात खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओमध्ये एका लाईव्ह स्टेज शो दरम्यान घडलेली एक घटना दाखवण्यात आली आहे. या व्हिडिओत धनंजय शर्मा गायक दिसत असून, त्यानं स्टेजवर केलेल्या कृतीमुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
बिहारच्या मुझफ्फरपूर येथे एका लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्न समारंभात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात धनंजय शर्मा आपल्या टीमसह परफॉर्म करत होते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी बरीच लोक उपस्थित होते. स्टेजवर अनेक महिला डान्सर डान्स करत होते.
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, की गायक अचानक एका डान्सरकडे जातो. तिला उचलतो आणि थेट स्टेजवरुन खाली गर्दीत फेकून देतो. डान्सर गर्दीत फेकली जाते आणि जमिनीवर पडते. त्यानंतर काही उपस्थित जण तिला वाचवण्याचा प्रयत्न करतात. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी गायकावर टीका केली आहे. गायकाचे हे वर्तन अत्यंत आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं आहे. तसेच काहींनी कारवाईची मागणीही केली आहे.
वाद वाढल्यानंतर धनंजय शर्माने या प्रकरणात आपली बाजू मांडली. त्यानं व्हिडिओ शेअर करत असा दावा केला की, स्टेजवरील डान्सर त्याच्याशी गैरवर्तन करत होते. 'लोकांना सत्य काय आहे, हे ठाऊक नाही. स्टेजवर गाणे सुरु होते. माझी स्टेप होती. मी डान्सरला टक्कर देणार होतो. डान्सरने टक्कर दिली नाही. उलट माझे शरीर त्यांनी पकडले. त्यांनी मला स्टेजवरुन फेकण्याचा प्रयत्न केला. एका डान्सरने मला लाथ मारण्याचा प्रयत्न केला'.
'माझा डान्सर महिलेला सार्वजनिक ठिकाणी ढकलण्याचा हेतू नव्हता. ते माझ्याकडून चुकून झालं. मी या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ अपलोड करेन. मला चुकीचं ठरवणाऱ्यांनी संपूर्ण व्हिडिओ पाहावा. नंतर मला ट्रोल करावे', असं गायक म्हणाला.
