Bhargavi Chirmule On Groupism in Marathi Industry: सिनेसृष्टी (Marathi Film Industry) दुरून जेवढी ग्लॅमरस दिसते, तेवढीच तिची दुसरी बाजू प्रत्यक्षात मात्र अंधारलेली आहे. याची अनेक उदाहरण आजवर आपण पाहिले. तसेच, अनेक कलाकारांनीही याबाबत अनेकदा सांगितलं आहे. इंडस्ट्रीतील काही वाईट गोष्टींपैकीच एक, ग्रुपिझम... बॉलिवूडमधल्या (Bollywood) ग्रुपिझमवर बऱ्याचदा चर्चा झालीय, त्यावरुन अनेक स्टार्सवर टीकेची झोडही उठवली गेली होती. पण,  आता ग्रुपिझमचं पेव थेट मराठी इंडस्ट्रीपर्यंत येऊन पोहोचलंय. याबाबतही अनेक कलाकारांनी त्यांना आलेले अनुभव सांगितले आहेत. अशातच मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले (Bhargavi Chirmule) हिनंही याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. 

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मराठी अभिनेत्रीनं (Marathi Actress) ग्रुपिझमवर आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे. भार्गवी चिरमुले म्हणाली की, "ग्रुपिझम आहे, शंभर टक्के आहे. आणि ते त्यांच्या कंफर्ट झोनमध्ये काम करतात. हे चुकीचं आहे बरोबर, यामध्ये मला पडायचं नाही. पण, आपण तिथपर्यंत पोहोचणं फार कठीण झालं आहे. जे फिल्म्सच्या बाबतीत घडताना दिसतं. फिल्म्समध्ये तर ग्रुपिझम दिसतो. ते त्यांच्या लोकांना घेऊन सिनेमे करतात पण, ते त्यांच्या कंफर्टझोनमधून बाहेर येत नाहीत. त्यामुळे वेगळ्या कलाकारांना एक्सप्लोर करत नाहीत. ते आपल्याला भेट, बोलतात, अरे, आपण एकत्र काम करु, पण ते आपल्याबरोबर काम करत नाहीत."

"त्यांच्या सगळ्या प्रिमिअर्समध्ये आपण जातो, पार्टीमध्ये जातो. यशामध्ये सहभागी होतो. पण, त्यांच्या सिनेमात आपण नसतो, याचं एक कलाकार म्हणून वाईट वाटतं. कारण आम्हालाही एक कलाकार म्हणून तुमच्याबरोबर काम करायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे. आम्हाला तुमच्याकडून शिकायचं आहे पण ते आमच्याकडे आणि काही कलाकारांपर्यंत पोहोचत नाही. सगळ्यांचे आपापले ग्रुप आहेत. आणि ते ग्रुप फोडणं फार कठीण आहे. त्यांच्या प्रत्येक ग्रुपमध्ये असे कलाकार आहेत, जे वेगवेगळ्या पद्धतीची काम करु शकतात. त्यांनी त्यांचं एक वेगळं विश्व निर्माण केलं आहे. आणि आपण कितीही मेहनत घेतली तरी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, हे दुर्दैव आहे. माझ्यासारखे अनेक कलाकार आहेत जे सध्या या गोष्टींचा सामना करत आहेत. एकतर ते आम्हाला कलाकार मानत नाहीत, असं मला वाटायला लागलंय किंवा आपल्याबरोबर काम करुन त्यांना काही फायदा होणार नाही, असं असावं", असं भार्गवी चिरमुले म्हणाली आहे.

दरम्यान, गेल्या बऱ्याच काळापासून भार्गवी चिरमुले स्क्रिनपासून दूर आहे. त्यापूर्वी तिनं रंगभूमीवर अनेक नाटकं केली. त्याचसोबत भार्गवीनं अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'वहिनीसाहेब', 'भाग्याची ही माहेरची साडी', 'फू बाई फू','जागो मोहन प्यारे', 'स्वराज्यजननी जिजामाता', 'मोलकरीण बाई', 'आई मायेचं कवच' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

RJ Mahvash Trolled On Video: 'कुणाचा नवरा चोरणंही चिटिंगच...' युझवेंद्र चहलची रुमर्ड गर्लफ्रेंड RJ महवश स्वतःच्याच व्हिडीओमुळे ट्रोल