Bhagyashree Nhalve On Periods And Women Health: 'कुंकू, टिकली आणि टॅटू' (Kunku Tikali Ani Tatoo), 'रमा राघव' (Rama Raghav), 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर', 'माटी से बंधी डोर' या मालिकांमधून अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे (Bhagyashree Nhalve) हिनं प्रेक्षकांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. मध्यंतरीचा काही काळ तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिनं मोठ्या अडचणींचा सामना केला. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत तिने तिच्या आईला गमावलं. लग्नानंतर लगेचच तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला. तिच्यासाठी हा मोठा आघात होता. पण, त्यातून ती मोठ्या धीरानं सावरली. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं अनेक गोष्टींवर आपली मतं मांडली आहेत. तसेच, तिच्या आजीनं दिलेल्या महत्त्वाच्या शिकवणीबाबतही तिनं भाष्य केलंय.
बाईसाठी पाळी येणं म्हणजे, शारीरिक थकवा आणि अवघडलेपणा. मासिक पाळी (Menstruation) ही महिलांच्या शरीरातील एक नैसर्गिक, नियमित प्रक्रिया आहे, जी दर महिन्याला घडते. प्रत्येक बाईसाठीच हे 5 दिवस फारच धकाधकीचे असतात. अशातच याच मासिक पाळीबाबत समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. अनेक स्त्रिया मासिक पाळी आल्यानंतर वेगळ्या बसतात, म्हणजेच, त्यांना घरातील इतर कुणी शिवायचं नसतं. यावर अभिनेत्रीनं तिच्या घरातही असचं काहीसं होतं, पण त्यामागचा हेतू वेगळा असल्याचं सांगितलं. तसेच, पुढे बोलताना ही तिच्या आजीची शिकवण असल्याचंही तिनं सांगितलं.
मासिक पाळीबाबत अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे नेमकं काय म्हणाली? (Actress Bhagyashree Nhalve On Menstrual Cycle)
'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे म्हणाली की, "लहानपणापासून ते आजही मी मासिक पाळीत बाजूला बसते. माझ्या आजीचं म्हणणं असायचं की बाजूला बसणं हा स्त्रियांना शाप नाहीये, तर त्यांना दिलेला आराम आहे. प्रत्येक गोष्टीकडे आपण कोणत्या दृष्टीनं बघतो तेच महत्वाचं असतं. मला अजिबात त्याची लाज वाटत नाही. मी या गोष्टीच्या विरोधातही जात नाही. याकडे ब्रेक घेऊन बघा. चार दिवस आराम करुन बघा. स्वत:ला वेळ देऊन बघा. चार दिवस फक्त नामस्मरण करा, पेंटिग करा, पुस्तक वाचा, घरी निवांत बसून बघा... काय हरकत आहे? हे माझं म्हणणं आहे. मी कोणावर थोपवत नाहीये. मी आता लग्नानंतर सासरीही बाजूला बसते. माझा त्यावर काहीच आक्षेप नाही. मी मस्त निवांत बाजूला बसते, खाते, खूप झोपते. त्यामुळेच मी निरोगी राहते. देवाला जाणं न जाणं हा वेगळा प्रश्न आहे. पण तुम्ही तुमच्या घरी आराम करुन बघा हे शरीरासाठी खूप महत्वाचं आहे..."
"आज मुलींमध्ये फर्टिलिटीच्या खूप समस्या आहेत. पीसीओडी, पीसीओएस आहेत. हे कशामुळे होतंय? कारण आपण मुली ना सगळ्या गोष्टीत बरोबरी करायला जातो. नका करु. मुली आधीच मुलांपेक्षा श्रेष्ठ आहेत, हे देवानं दाखवून दिलंय. बसा आराम करा, एन्जॉय करा, फिरायला जा, थोडक्यात ब्रेक घ्या...", असं भाग्यश्री न्हाळवे बोलताना म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
