Ayesha Takia: एकेकाळी आपल्या गोड लूकने आणि निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेली अभिनेत्री आयेशा टाकिया (Ayesha Takia) आज जरी चित्रपटसृष्टीपासून दूर असली, तरी ती सतत चर्चेत असते. आज ( 10 एप्रिल ) ती आपला 40वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने तिच्या करिअरपासून आताच्या आयुष्यापर्यंतचा प्रवास जाणून घेऊया.
या चित्रपटांमधून मिळाली लोकप्रियता
आयशाने 2004 मध्ये टारझन: द वंडर कार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर सोचा ना था, दिल मांगे मोर , सलाम-ए-इश्क आणि पाठशाला सारख्या चित्रपटांत ती झळकली. मात्र, सलमान खान सोबतच्या वॉन्टेड या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली.
शेवटचा चित्रपट फ्लॉप, घेतला मोठा निर्णय
आयशाचा शेवटचा चित्रपट मोड हा 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. यानंतर तिने अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम करत वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.
लग्नानंतर बदललं आयुष्य
आयशाने 2009 मध्ये तिचा बॉयफ्रेंड फरहान अझमी याच्यासोबत लग्न केलं. तेव्हा ती केवळ 23 वर्षांची होती. फरहान हा रेस्टॉरंट व्यवसायिक असून राजकारणी अबू अझमी यांचा मुलगा आहे. लग्नानंतर आयशाने ‘टाकिया आझमी’ हे आडनाव धारण केलं. या दाम्पत्याला एक मुलगाही आहे.
आता काय करते आयशा?
सध्या आयशा मुंबईत आपल्या कुटुंबासोबत राहते आणि लाइमलाइटपासून दूर आहे. ती प्रामुख्याने प्राण्यांच्या संरक्षणाशी (Animal Welfare) संबंधित कामात सक्रिय आहे. तसेच, वीगन लाइफस्टाइलला प्रोत्साहन देण्याचं कामही ती करत आहे. सोशल मीडियावर मात्र ती चांगलीच अॅक्टिव्ह असून, तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. एकेकाळची बॉलिवूड स्टार असलेली आयशा टाकिया आज वेगळ्या मार्गाने आपलं आयुष्य जगत असली, तरी तिची लोकप्रियता अजूनही कायम आहे.
