Ashok Saraf On Marathi Hindi Film Industry: ...म्हणून मला आणि लक्ष्मीकांतला हिंदीत फक्त नोकराच्याच भूमिका मिळाल्या; अशोक सराफ यांनी आढेवेढे न घेता थेटच सांगितलं
Ashok Saraf On Marathi Hindi Film Industry: मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना हिंदी सिनेमांत फक्त नोकराचीच भूमिका का मिळायची? याचं स्पष्ट उत्तर अशोक सराफांनी दिलं आहे.

Ashok Saraf On Marathi Hindi Film Industry: तब्बल तीन दशकं मराठी सिनेसृष्टीसह (Marathi Industry) बॉलिवूडमधील (Bollywood News) प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं नाव म्हणजे, विनोदसम्राट अशोक सराफ (Ashok Saraf). महाराष्ट्राच्या (Maharashtra News) लाडक्या अशोक मामांना महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. एकापेक्षा एक, वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारुन अशोक मामांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कधी लक्ष्याचा मित्र बनून साकारलेली भन्नाट कॉमेडी, तर कधी रुपेरी पडद्यावर साकारलेला व्हिलन... अशोक सराफांनी आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीनं प्रेक्षकांना आपलंसं केलं. मराठी सिनेसृष्टीवर एकहाती राज्य करणारा हा नट, हिंदीत मात्र फक्त आणि फक्त नोकराच्याच भूमिकेत झळकला, कधीच हिरो होण्याची संधी मिळाली नाही... का?
दिग्गज अभिनेता असलेल्या या नटाला मात्र हिंदी सिनेसृष्टीत कायम नोकराचीच भूमिका करावी लागली. फक्त अशोक सराफच नव्हे, तर दिग्गज दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) म्हणजे, मराठी रसिकप्रेक्षकांच्या लाडक्या लक्षानंही हिंदी सिनेसृष्टीत नोकराचीच भूमिका साकारली, तर असं का? मराठीत सुपरस्टार म्हणून रुपेरी पडदा गाजवणारे दिग्गज नट, हिंदी सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर कधीच हिरो म्हणून का झळकले नाहीत? हा प्रश्न तुमच्या-आमच्या सर्वांच्याच मनातला. याचंच उत्तर अशोक सराफ यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिलं आहे.
मराठी नटांना हिंदीत नोकराचीच भूमिका का मिळते? अशोक सराफांनी स्पष्ट केलं
अमुक तमुक युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अशोक सराफ म्हणाले की, "मराठी लोकांची इमेज हिंदीत बसत नाही. त्यांच्या दृष्टीनं हिरो म्हणजे, गोरा पान... तो काम काय करतो, हे कुणाला माहीत नसतं. आणि कोणाला कळतंही नाही. तसं तर आपण दिसत नाही. त्यामुळे आपल्याला हिरोचे रोल कधी मिळणार नाही. मग आपण कॅरेक्टर शोधतो. माझ्यासारख्या किंवा लक्ष्मीकांत सारख्या चेहऱ्याला मग नोकराची भूमिका मिळते. त्याशिवाय काही मिळतच नाही. आता ते करायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं. जर तुम्हाला ते चांगले पैसे देत असतील आणि जर तुमचा फायदा होत असेल तर काहीच हरकत नाही. पण, लोक काय म्हणतात यात अर्थ नाही. तिथे आम्ही हिरो म्हणून काम करणं हे होऊच शकत नाही. मग आम्ही कशाला हट्ट धरायचा."
"तुम्हाला जर वेळ असेल तर काम करा. मी हिंदीत जेव्हा मला वेळ असेल फक्त तेव्हाच काम केलंय. एक भोजपुरी प्रोड्युसर आला होता. मी कधी भोजपुरी केलेलं नाही. एक भूमिका होती. मी त्याला म्हटलं माझ्याकडे वेळ नाही. या 15 दिवसांत होत असेल तर बघ. तो म्हणाला हो चालेल. मी परफेक्ट त्यांची भाषा बोललोय. त्यांचा लेहेजा पकडला की तुम्ही भोजपुरी बोलू शकता. मला भोजपुरीचं त्या वर्षीच बेस्ट अॅक्टर अवॉर्ड मिळालं. माझी जी भाषाच नाही त्या भाषेत मला अवॉर्ड मिळालं.", असं अशोक सराफ म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























