Ashok MaMa Colours Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) लोकप्रिय मालिका 'अशोक मा.मा.' (Ashok MaMa) सध्या प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करून बसली आहे. मालिकेनं नुकतेच 300 भागांचा पल्ला गाठला आहे. आणि आता मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. स्पर्धेत दहा लाखाचं बक्षीस मिळवल्यानंतर भैरवीच्या घरी आनंदाचं वातावरण असतं. अशोक, नीलिमा आणि मुलांनी तिच्यासाठी खास सरप्राईज पार्टी आयोजित केली असते. कुटुंबाचा हा स्नेह आणि आदर पाहून भैरवी खूप खुश आहे. मात्र, या आनंदाच्या क्षणी एक भावनिक वळण येतं भैरवीने संपूर्ण बक्षीसाची रक्कम अनिशचं कर्ज फेडण्यासाठी वापरल्याचं समोर येतं.

अनिशचा संताप, त्याचे भैरवीवरील कठोर शब्द, आणि त्यानंतर कुटुंबातील वातावरण ताणलेलं होतं. पण या सगळ्यातूनही भैरवी शांत राहते, तिचा आत्मविश्वास ढळत नाही. यासगळ्यामध्ये भैरवीला खंबीर साथ लाभली आहे ती म्हणजे अशोक मामा यांची. 

याच काळात भैरवीला राजन सुखटणकर यांच्या सुखटणकर फूड्सकडून केकसची ऑर्डर मिळते आणि तिच्या आयुष्यात नवं पान उघडते. मात्र, एक छोटासा गोंधळ होतो आणि केकऐवजी मोदक पोहोचतात! जे संकट वाटत होतं, तेच आता भैरवीसाठी संधी ठरतं. राजन त्या मोदकांवर इतका फिदा होतो की तो थेट 30 आउटलेट्ससाठी ऑर्डर देतो. पण या संधीबरोबर एक मोठं आव्हानही येणार आहे ... आता ते आव्हान काय असेल? भैरवी ती कशी पार पाडेल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.                                       

घरातील अनिशच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे तणाव आणखी वाढतो. अशोक मामा आणि भैरवी या सगळ्याचा मानसिक ताण झेलत असताना एक नवा निर्णय घेतात. या काळात भैरवीचा नव्याने उभं राहण्याचा निर्धार घेताना दिसणार आहे. हे सगळं बघणं प्रेक्षकांना प्रेरणादायी वाटणार आहे.

भैरवी आता आयुष्याच्या एका नव्या टप्प्यावर आहे जिथे संकटावर मात करून पुन्हा उभं राहण्याची संधी तिच्याकडेचालून येणार आहे. यात घरच्यांची साथ तिला कशी मिळणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.