Arvind Kejriwal: काही चित्रपट आणि वेब सीरिज त्यांच्या दमदार कथानकामुळे सतत चर्चेत राहतात. अनेक वेब सीरिज केवळ सामान्य प्रेक्षकांनाच नाही, तर नामांकित व्यक्तींनाही इतक्या भावतात की त्या उघडपणे त्यांची प्रशंसा करतात. आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी नुकतीच रिलीज झालेल्या एका वेब सीरिजची भरभरून प्रशंसा केली आहे. या वेब सीरिजचे नाव आहे ‘महारानी सीझन 4’, ज्याबद्दल केजरीवाल यांनी ट्वीट केलंय. बिहार निवडणुकांनंतर केजरीवाल यांनी केलेलं हे ट्विट लक्ष वेधून घेणारे आहे.
काय म्हणाले अरविंद केजरीवाल?
रविवारी केजरीवाल यांनी x अकाऊंटवर पोस्ट शेअर करत महारानी सीजन 4 “नक्की पाहावी” अशी शिफारस केली आणि संपूर्ण टीमच्या धैर्याचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, “सोनी लिव्हवर ‘महारानी 4’ वेब सीरिज जरूर पहा. आजच्या राजकारणाची कुरुप सत्य या सीरिजमध्ये अगदी स्पष्टपणे दाखवलं आहे. सत्य दाखवण्याची हिम्मत केल्याबद्दल संपूर्ण टीमला सलाम.” राजकारणावर आधारित या सीरिजमध्ये दाखवलेल्या सत्तासंघर्ष, भ्रष्टाचार आणि बॅकडोअर स्ट्रॅटेजींच्या चित्रणाकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले.
सीझन 4 मध्ये काय नवीन?
7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘महारानी 4’ मध्ये कथा बिहारच्या राज्यकारभारातून दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणाकडे सरकते.
-ह्यूमा कुरेशी पुन्हा राणी भारतीच्या भूमिकेत दिसते.
-राणी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देते आणि तिची मुलगी रोशनी पदभार सांभाळते.
-या सीझनमध्ये कोहिनूर हिऱ्याशी संबंधित नवीन राजकीय उपकथाही महत्त्वाची ठरते.सत्ता, विश्वासघात, पक्षांतर्गत कलह आणि राजकीय महत्त्वाकांक्षा यांचं तीव्र चित्रण कायम ठेवण्यात आलं आहे
‘महारानी’ फ्रँचायझीची परंपरा कायम
सुभाष कपूरच्या दिग्दर्शनातील ‘महारानी’ मालिका गेल्या तीनही सीझनपासून ग्रामीण-शहरी राजकारण,जातीव्यवस्थेची गुंतागुंत,कुटुंबीयांतील सत्तासंघर्ष आणि वास्तवाशी साधर्म्य असलेल्या राजकीय घटनांवर आधारित कथानक यामुळे चर्चेत राहिली आहे. चौथ्या सीझनमध्येही तेवढाच ताण, प्रसंग आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय धुरळा पाहायला मिळतो.केजरीवाल यांच्या या पोस्टवर काही मिनिटांतच हजारो प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकांनी सीरिजचे वास्तववादी राजकीय चित्रण मान्य करत त्यांची शिफारस योग्य असल्याचं म्हटलं.
बिहारच्या विजयाचे खरे हिरो निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार; 'आप'ची पोस्ट व्हायरल
अतिशय चुरशीचा अंदाज व्यक्त केलेली बिहारची निवडणूक एकतर्फीच झाली आणि भाजपप्रणित एनडीएने (NDA) 202 जागा मिळवल्या. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन फक्त 35 जागांपर्यंत मजल मारू शकलं. आम आदमी पक्षाने मात्र या निवडणूक पद्धतीवर टीका केली आहे. आप पक्षाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून बिहारच्या विजयाचे खरे हिरो हे केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार असल्याचा टोला लगावला होता. बिहारमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने SIR पद्धत राबवली आणि ही निवडणूक आधीच सेट केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हेच बिहारच्या विजयाचे खरे शिल्पकार असल्याचं म्हणत आपने भाजपला टोला लगावला आहे.