Apurva Nemlekar On Star Pravah Serial: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे, अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar). 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत शेवंता नावाचं पात्र साकारून तिनं प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं. तसंच बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातही ती सहभागी झाली होती. तिनं आजवर साकारलेली प्रत्येक भूमिका विशेष गाजली... अलिकडेच अपूर्वा नेमळेकर स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत झळकलेली. पण काही दिवसांपूर्वीच या मालिकेनं निरोप घेतला. पण, आता अपूर्वा नेमळेकर नव्या मालिकेत झळकणार आहे. बरं नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत अपूर्वा यावेळी दिसणार आहे.
स्टार प्रवाहच्या शुभविवाह मालिकेत लवकरच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत सात वर्षांचा लीप येणार असून नवं पात्र म्हणजेच, एसीपी अपूर्वा पुरोहितची एण्ट्री होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर एसीपी अपूर्वा पुरोहित हे पात्र साकारणार असून पहिल्यांदा ती पोलीस अधिकारी साकारणार आहे.
आपल्या नव्या भूमिकेविषयी सांगताना अपूर्वा नेमळेकर म्हणाली की, "स्टार प्रवाहसोबत जिव्हाळ्याचं नातं आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेत मी साकारलेल्या सावनी या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं... काही दिवसांपूर्वीच मी एका मुलाखतीमध्ये मला पोलीस अधिकारी साकारायला आवडेल असं म्हटलं होतं. माझी इच्छा या भूमिकेच्या निमित्तानं पूर्ण होणार आहे. शुभविवाह मालिकेत मी एसीपी अपूर्वा पुरोहित हे पात्र साकारणार आहे. पहिल्यांदा अशा धडाकेबाज रुपात दिसणार आहे. नवं पात्र साकारताना नेहमी उत्सुकता असते. शुभविवाह मालिकेतली भूमी म्हणजेच, मधुरा देशपांडेसोबत 13 वर्षांनंतर पुन्हा काम करणार आहे. आराधना मालिकेत आम्ही एकत्र काम केलं होतं. मधुरा माझी खूप चांगली मैत्रीण आहे... त्यामुळे काम करताना धमाल येणार आहे, अशी भावना अपूर्वानं व्यक्त केली आहे..." दरम्यान, अपूर्वा पुरोहितच्या येण्यामागे नेमकं काय रहस्य आहे? तिच्या येण्यानं भूमी-आकाशच्या आयुष्यावर काय परिणाम होणार? हे पहाणं औत्सुकतेचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :