''बकवास प्रपोगंडा चित्रपट..', अनुराग कश्यप 'केरला स्टोरी 2' सिनेमावर कडाडला, निर्मात्यालाही सुनावलं, म्हणाला...
कोच्ची विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनुराग यांनी चित्रपटाला थेट “प्रोपोगंडा” म्हणत त्यावर नाराजी व्यक्त केली.

Anurag kadhyap on kerala story 2: 2023 साली चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या ‘द केरल स्टोरी’नंतर आता त्याचा पुढचा भाग ‘द केरल स्टोरी 2: गोज बियॉन्ड’ प्रेक्षकांसमोर येण्याच्या तयारीत आहे. मात्र चित्रपटाचा टीझर समोर आल्यानंतरपासूनच नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कायदेशीर कचाट्यात सापडलेल्या या चित्रपटावर सध्या प्रचंड टीका होत आहे. दरम्यान, या चित्रपटावर बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी कडाडून टीका केली आहे. द केरला स्टोरी 2 हा बकवास प्रपोगंडा चित्रपट असल्याचं त्यांनी म्हटलं. निर्माता लोभी माणूस आहे, त्याला लोकांमध्ये फूट पाडून फक्त पैसा कमवायचा आहे, असेही तो म्हणालाय. अनुरागच्या या टिकेवरही आता मनोरंजनसृष्टीतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
काय म्हणाला अनुराग कश्यप?
कोच्ची विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनुराग यांनी चित्रपटाला थेट “प्रोपोगंडा” म्हणत त्यावर नाराजी व्यक्त केली. ट्रेलरमध्ये दाखवलेल्या बीफच्या प्रसंगावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “द केरळ स्टोरी २ बकवास सिनेमा आहे. हा एक बकवास प्रोपगंडा सिनेमा आहे. ट्रेलरमध्ये जे दाखवलंय त्याप्रमाणे कोण बीफ खायला लावतं? अशाप्रकारे तर कोणी खिचडीही खाऊ घालत नाही. या लोकांना फक्त पैसा कमवायचा आहे. लोकांमध्ये फूट पाडायची आहे. सिनेमाचा मेकर तर एकदम लोभी माणूस आहे. त्याला फक्त पैसा मिळवायचा आहे,” असे तो म्हणाला.
केरळच्या मुख्यमंत्र्यांचीही सिनेमावर टीका
चित्रपटावरील विरोध केवळ चित्रपटसृष्टीपुरता मर्यादित राहिलेला नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनीही या सिनेमावर टीका केली आहे. त्यांच्या मते, चित्रपटातून राज्याची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने सादर केली जात असून सामाजिक ऐक्यावर परिणाम होऊ शकतो. विशिष्ट अजेंडा पुढे नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, या वादात न्यायालयीन घडामोडींचीही भर पडली आहे. केरळ उच्च न्यायालयाने चित्रपटाचे निर्माते आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (CBFC) यांना नोटीस बजावली आहे. सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. चित्रपटाच्या नावामुळे आणि काही दृश्यांमुळे केरळची प्रतिमा धोक्यात येत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित आणि विपुल अमृतलाल शाह निर्मित हा चित्रपट 27 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असला तरी त्याआधीच सामाजिक आणि कायदेशीर वादामुळे तो चर्चेत आला आहे.
























