AR Rahman Statement Sparks Debate: गेल्या काही दिवसांपासून संगीतकार ए. आर रहमान आपल्या वक्तव्यावरून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी छावा चित्रपट आणि धार्मिक कारणामुळे काम मिळत नसल्याचं विधान केलं होतं. ए. आर रहमान यांनी केलेल्या विधानानंतर ते टीकेचे धनी झाले आहेत. दरम्यान, काही सेलिब्रिटी ए. आर रहमानच्या समर्थनार्थ त्यांची साथ देत आहेत. ए. आर रहमानच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असं काहींनी म्हटलं आहे. दरम्यान, अलिकडेच ज्येष्ठ भजन सम्राट आणि गायक अनुप जलोटा यांनी या वादात उडी घेतली. त्यांनी ए. आर रहमानला भलताच सल्ला दिला आहे. अनुप जलोटा यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे ते पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत.
आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत अनुप जलोटा म्हणतात, "ए. आर रहमानच्या विचारांशी मी असहमत आहे. रहमान मूळ हिंदू होते. त्यानंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत खूप कामे केली आहेत. त्यांनी लोकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. पण जर त्यांना असं वाटत असेल की, केवळ मुस्लिम धर्म स्वीकारल्यामुळे काम मिळत नाहीये, तर मी त्यांना एक सल्ला देऊ इच्छितो, त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारावा. त्यानंतर त्यांनी काम मिळतं की नाही, हे पाहावं. जर ए. आर रहमान यांच्या मते धर्मांमुळे कामावर परिणाम होत असेल तर, त्यांनी पुन्हा एकदा धर्मांतर करून पाहावं, आपलं नशीब अजमावून पाहावं", असं म्हणत अनुप जलोटा यांनी ए. आर रहमान यांना सल्ला दिला.
सध्या अनुप जलोटा यांनी ए. आर रहमान यांना दिलेला सल्ला चर्चेचा विषय ठरत आहे. ए. आर रहमान यांनी टीका होत असल्याचं पाहून आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं. "माझा हेतू कुणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता. भारत हे प्रेरणस्थान, गुरू आणि घर आहे. कधीकधी केलेल्या वक्तव्यांचा लोकांमध्ये गैरसमज होतो. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे", असं ए. आर रहमान यांनी स्पष्ट केलं.
ए. आर रहमान यांचं खरं नाव काय?
ए. आर रहमान यांचे खरे नाव दिलीप कुमार होते. वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्यांना लोक अल्लाह रक्खा रहमान या नावाने ओळखू लागले.