Kangana Ranaut :  कंगना रनौत जरी सेलिब्रिटी असली तरी या प्रकरणात ती एक आरोपी आहे, त्यामुळे तिला न्यायालयात हजर राहावंच लागेल. जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यादरम्यान मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी न्यायालयानं दिलासा नकारताना  खडे बोल सुनावले. 


एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं जावेद अख्तर यांच्या विरोधात काही आक्षेपार्ह विधानं केली होती. त्याला कंगनाची बहिणी रंगोली चंदेलनही दुजोरा देत समाजमाध्यमांवर याबाबत कंगनाच्या समर्थनार्थ काही पोस्ट केल्या होत्या. मात्र, या प्रकरणात काहीही तथ्य नसून यातनं आपली नाहक बदनामी होत आहे, असा दावा करत कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारत फौजदारी मानहानीचा खटला दाखल आहे. मार्च 2021 पासून या खटल्याला गैरहजर राहण्यासाठी कंगनानं कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सतत सूट मागितली होती. न्यायालयानं वॉरंट बजावल्यानंतर अखेर 20 सप्टेंबर 2021 रोजी कंगना न्यायालयात हजर राहिली होती. मात्र त्यानंतर कंगनानं अंधेरी दंडाधिकारी न्यायालयातील या मानहानीच्या खटल्यादरम्यान हजर राहण्यापासून कायमची सूट देण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला होता.


 हा अर्ज दंडाधिकारी आर. आर. खान यांनी फेटाळून मंगळवारी लावला आहे. त्याचं सविस्तर निकालपत्र गुरुवारी उपलब्ध झालं. कंगना या खटल्यात आरोपी असूनही ती कामकाज स्वतःच्या अटींवर चालविण्याचा प्रयत्न करतेय. सुनावणीसाठी कायमस्वरूपी गैरहजर राहणे हा तिचा अधिकार होऊ शकत नाही. कायद्याच्या तरतुदी आणि जामीनाच्या शर्तींचे पालन करणं तिच्यासाठी बंधनकारक आहे. न्यायालयाने तिला गैरहजर राहण्याची मुभा दंडाविना दिलेली आहे. पण तिने न्यायालयीन कामात सहकार्य करण्याच्या दृष्टीने सुनावणीला कधीही हजेरी लावली नाही. 


कंगना एक बॉलिवूड सेलिब्रिटी असल्यामुळे व्यावसायात व्यस्त असेलही, पण या प्रकरणात ती एक आरोपी आहे. मात्र, या खटल्यात आपल्या उपस्थितीची आवश्यकता नाही आणि माझे वकिल सर्व पाहतील, यातनं तिची बेफिकीर मानसिकता समोर येते. जर तिला गैरहजर राहण्याची परवानगी दिली, तर ज्येष्ठ नागरिक असलेले तक्रारदार यामुळे बाधित होतील आणि खटल्याचे कामही रखडेल, अशी रोखठोक निरीक्षण न्यायालयानं आपल्या नोंदविली आहेत. त्यामुळे सरसकट गैरहजेरीची परनावगी नाकारत केवळ विशेष परिस्थितीतच तिला गैरहजर राहण्यास सूट देण्याबाबत विचार होईल, असंही न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.