Amruta Subhash With Husband Sandesh Kulkarni On ABP Majha Maha Katta: अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेता संदेश कुलकर्णी म्हणजे, मराठी मनोरंजनसृष्टीतील क्युट कपल्सपैकी एक. हे जोडपं सोशल मीडियावर नेहमीच क्युट व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतं. यावरुन त्यांची क्युट केमिस्ट्री दिसते. माझा कट्ट्यावर मराठी सिनेसृष्टीतलं हे जोडपं आलं होतं. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक गप्पा मारल्या.
मुलाखतीत बोलताना अमृता आणि संदेश यांनी त्यांची भन्नाट लव्हस्टोरी आणि अनेक किस्से सांगितले. "आम्ही दुबेजींच्या वर्कशॉपमध्ये भेटलो, आमच्यात मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं नाही, कारण त्यावेळी त्यानं मला नकार दिला... पण नंतर त्यानं मला होकार दिला...", असं अमृतानं सांगितलं.
अमृता आणि संदेश यांची क्युट लव्हस्टोरी
अमृता म्हणाली की, नाही... मी संदेशच्या प्रेमात पडलेले... सोळा वर्षांची असताना मी त्याच्या प्रेमात पडलेले आणि त्यावेळी त्यानं मला नकार दिलेला... त्यावर संदेश कुलकर्णी म्हणाले की, बालविवाहाला बंदी असल्यामुळे सहाजिकच मी नकार दिला. साधी गोष्ट आहे ना, 16 वर्षांच्या मुलीला कोण होकार देणार?
संदेश कुलकर्णींसोबतच्या लव्हस्टोरीबाबत बोलताना अमृता सुभाषनं सांगितलं की, "याचं कारण म्हणजे, माझी सर्वात जवळची मैत्रीण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी... पहिली अभिनयाची गुरू माझी आई... आणि माझे अभिनयाचे दुसरे गुरू सत्यजित दुबे... याच्या नाट्यशिबीरात मला सोनाली पहिल्यांदा भेटली... तिची आणि माझी मैत्री झाली, तिचा 3 नोव्हेंबरला वाढदिवस असतो, त्यावेळी मोबाईल नव्हते, त्यामुळे आमच्या त्या काळात... आम्ही लोकांना भेटून एकमेकांना शुभेच्छा द्यायचो... त्या दिवशी मी ठरवलेलं अमृताला भेटायचं शुभेच्छा द्यायच्या आणि लग्नाला जायचं... मी बाबांसोबत सोनालीच्या घरी गेले, पायऱ्या चढून तिच्या घराजवळ जाऊन डोकावले, त्यावेळी एक अत्यंत उमदा तरुण, त्यानं कर्ता घातलेला आणि तो कुर्त्याच्या बाह्या मागे सारत असताना मला दिसला, त्याच क्षणी मला कळालेलं की, हा माझा नवरा आहे... तो होता संदेश कुलकर्णी..."
"नंतर आम्ही दुबेजींच्या वर्कशॉपमध्ये भेटलो, आमच्यात मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं नाही, कारण त्यावेळी त्यानं मला नकार दिला... पण नंतर त्यानं मला होकार दिला...", असं अमृतानं सांगितलं.
अभिनेते संदेश कुलकर्णी यांनी लव्ह स्टोरीबाबत बोलताना सांगितलं की, "मुळात ज्यावेळी अमृतानं मला विचारलं, त्यावेळी ती खरंच खूप लहान होती... त्यावेळी मी तिच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठा होतो... याबाबतचा एक किस्सा म्हणजे, आम्ही लग्न केल्यानंतर, महाबळेश्वरला हनिमूनसाठी गेलेलो... त्यावेळी तिथे मोबाईल नसल्यामुळे कुणाच्या तरी हातात कॅमेरा देऊन आमचा एक फोटो काढा असं सांगावं लागायचं... अमृता इतकीशी बारकीशी दिसत होती माझ्या शेजारी, एका माणसाला सांगितलं की, प्लीज आमचा एक फोटो काढा... त्यानं फोटो काढला आणि कॅमेरा देताना तो मला म्हणाला की, शाळेची पिकनिक आहे का...? म्हणजे, त्याला असं वाटलेलं की, शाळेच्या मास्तरनं एका पोरीला बाजूला काढलंय... माझ्यासोबतचे मला मास्तर म्हणायचे, पण अशा अर्थानं मला कधी कुणी समजून घेईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं... "
NSD ला जाण्याचं का ठरवलं? अमृता म्हणाली...
NSD ला जाण्याचं ठरवल्याबाबत बोलताना अमृता म्हणाली की,"माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी होत गेल्यात, त्या मी ठरवल्या नाही... या गोष्टीवर माझा विश्वास आहे की, वाहत जायचं... जर तुम्ही वाहत गेलात, तर तुम्हाला जे हवं असतं, ते तुम्हाला मिळतंही जातं... माझ्या नशीबानं मी माझ्या आई-वडिलांच्या घरात जन्म घेतला. माझी आज्जी आशाताई देशपांडे, रहिमदपूर माझं आजोळ... माझ्या आजीनं तिथं पहिलं वाचनालय सुरू केलं, तिनं तिथल्या बायकांना वाचायला उद्युक्त केलं, तिनं मलाही वाचनाची आवड लावली... ती मला पुस्तकं वाचायला सांगातयची... कुठलं पुस्तक आवडलं आणि कुठलं पुस्तक का नाही आवडलं, हे सांग, असं सांगायची... त्यामुळे तिनं मला लहानपणीच चांगली संहिता आणि वाईट संहिता यातला फरक शिकवलेला... नंतर गोविंद मामा म्हणजे, गोपू देशपांडे... मला संतसाहित्य वाचायला लावलं... विचारायचा पुस्कत वाचलं की, नाहीस..."
"गोविंद मामा मला बाळकू म्हणायचा... आपण पुस्तक वाचताना असं उपडं ठेवतो की, नाही... तो मला सांगायचा बाळकू पुस्तक असं उपडं ठेवत नको जाऊस... तुला असं कुणी ठेवलं तर आवडेल का? अवघडशील ती, नाही... पुस्तकही अवघडतं... पुस्तक वाचता वाचता ठेवायचं असेल तर, मिटायचं आणि पान नंबर लक्षात ठेवायचं... नंतर आईमुळे दुबेजी माझ्या आयुष्यात आले... 'तुघलक' नावाचं नाटक दुबेजींनी दिग्दर्शित केलेलं... आई तालमीला जायची आणि मी शाळेतून घरी आले की, समोर संहिता असायची आणि आई काहीतरी पुटपुटक बसलेली असायची... मला कळायचं नाही, ही काय करते... आम्ही झाल्यानंतर आईनं 10 वर्ष काम सोडलेलं... त्यामुळे आम्हाला माहीत नव्हतं ती नाटकात काम करायची... NSD ची माझी आई गोल्ड मेडलिस्ट... नसरुद्दिन शाह आणि ओम पुरींची बॅचमेट... बाबांची बदलीची नोकरी होती... मला कळायचंच नाही आई अशी स्वतःशीच पुटपुटत काय बसते...? त्यावेळी तिनं सांगितलेलं मी तालिम करते... त्यावेळी आईनं मला जे सांगितलं, ते मी अजूनही विसरलेले नाही... अमृता तू एकटी असताना ती भूमिका तुझ्याशी जे बोलेल ना? ते सर्वांमध्ये बोलणार नाही... एक भूमिका हीसुद्धा माणूस आहे... ती तिच्या आतलं तुला काहीतरी सांगेल, त्यामुळेच कुठल्याही भूमिकेबाबत एकट्यानं वेळ घालवला पाहिजे..."
"NSD ला जाण्याचा निर्णय माझा नव्हता, तो सत्यजित दुबेंचा होता... मी पुरूषोत्तम करंडक जिंकले, तोपर्यंत मी संदेशच्या प्रेमात पडलेले... त्यानंतर मला असं वाटलेलं की, मला आता शिकायची काही गरज नाही, आता मला सगळं येतंय... पण दुबेजी मला म्हणाले, तुला शिकावं लागेल... आईसोबत त्यांनी मला एक निरोप पाठवला की, ती जर NSD ला गेली नाहीतर, मी तिला थोबाडीत मारिन... ती थोबाडीत मला खायची नव्हती, म्हणून मी NSD ला गेले...", असं अमृता म्हणाली.
NSD ला जाण्याचा विचार आला नाही : संदेश कुलकर्णी
संदेश कुलकर्णींनी सांगितलं की, "माझ्या मनातही NSD ला जाण्याचा विचार आला नाही... कारण त्या काळात मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनिअर होणं गरजेचं होतं... माझे वडील, मोठा भाऊ इंजिनिअर होता... त्यामुळे माझ्याकडे पर्याय नव्हता, तसं तेव्हा डोक्यातही नव्हतं की, असं काहीतरी करावं... कारण घरचे संस्कार... गमतीशीर गोष्ट अशी की, 'मसाला' नावाच्या सिनेमाचं मी दिग्दर्शन केलेलं, तेव्हा माझी आई सिनेमाच्या प्रीमियरला आलेली... सिनेमा करताना मी नोकरी सोडलेली... आईनं कौतुक केलं... सगळं तुझ्या मनासारखं झालं म्हणाली आता एखादी नोकरी बघ... "
पुढे बोलताना संदेश कुलकर्णींनी सांगितलं की, "आम्ही एकत्र आलो तेव्हा पार्टनर्स नावाची एकांकीका मी तिच्यासाठी लिहिली... नंतर तिच तिनं पुरूषोत्तमला सादर केलेली... त्यावेळी 'पार्टनर्स' केल्यानंतर आम्ही दोघं लाईफ पार्टनर्स झालो, अशी कॅचलाईन देता येईल... त्यावेळी मी पाहिलेलं की, ही दिग्दर्शन खूप छान करु शकेल... मी तिला सांगितलं की, तू दिग्दर्शन कर... मला लिहायला आवडतं, पण मला दिग्दर्शन करायला आवडत नाही... मी तिला सांगितलं की, तू दिग्दर्शन कर, मी लिहित जाईल... आपण वाटून घेऊ... पण तिला तिच्या अभिनयाच्या क्षेत्रात जायचं होतं... तिच्या मागे लागायचो, तू दिग्दर्शन कर... पण तिनं एक शॉर्ट फिल्म केली 'आज्जी' नावाची... पण आता तिनं दिग्दर्शन करायला हा काळ उजाडला..."
मराठीतल्या कलाकारांना खूप रिस्पेक्ट मिळतो : संदेश कुलकर्णी
संदेश कुलकर्णी म्हणाले की, "ओटीटी ही फार मोठी क्रांती आहे, त्यामुळे नवाजुद्दीन सिद्दिकी, जयदीप अहलावत, मनोज वाजपेयी, अमृता सुभाष यांसारख्या असंख्य कलाकारांना आपलं काम दाखवण्याची खूप चांगली संधी मिळाली... ओटीटी नसतं तर मिळाली नसती... ओटीटीचा प्रभाव एवढा आहे की, सो कॉल्ड स्टार्सनाही ओटीटीवर यावं लागलं... मराठीतल्या कलाकारांना खूप रिस्पेक्ट मिळतो, कारण आपल्याकडचे कलाकार खूप तगडे आहेत... हिंदीत काम करताना ते पूर्ण तयारीनिशी जातात..."
"ओटीटी नसतं तर 'असेन मी, नसेन मी' नाटक झालंच नसतं, कारण आम्ही दोघांनी ओटीटीतून कमावलेले पैसे त्या नाटकात टाकले होते... मगाशी विचारलं की, लक्ष्मी का सरस्वती... सरस्वतीसोबतच लक्ष्मीही महत्त्वाची आहे... कारण निर्माते म्हणून आम्ही फक्त नाव लावलेलं नाही... आम्ही कमावलेले पैसे आम्ही त्या नाटकात टाकलेले... त्यामुळे जर ते नाटक यशस्वी झालं नसतं, तर पुन्हा शून्यावर येण्याची ती वेळ होती... तितके पैसे टाकता आले, याचं कारण ओटीटीत तेवढे पैसे आम्हाला मिळत होते..."
अमृताच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल्यास, सध्या ती हिंदी सिनेसृष्टीत सक्रीय आहे. लवकरच तिची नेटफ्लिक्सवरची फिल्म 'लस्ट स्टोरीज 2' प्रदर्शित होणार आहे. 'लस्ट स्टोरीज 2'च्या निमित्ताने 'लाइफस्टाइल एशिया इंडिया' मॅगझिनच्या कव्हर पेजवर नीना गुप्ता, काजोल, मृणाल ठाकूर यांच्यासह बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींसह झळकली होती. ज्यात अमृताचा स्टनिंग अंदाज पाहायला मिळाला. याशिवाय ती आणि संदेश मराठी रंगभुमीवरही सक्रीय आहेत. त्यांच्या 'पुन:श्च हनिमून' या नाटकाचे प्रयोग जोरदार सुरू आहेत.