Amol Kolhe : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते (Sharad Pawar) आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी पुन्हा एकदा शिरुरच्या मैदानात विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यावर सर्वच स्तरावरुन त्यांच्यावर कौतुकांचा आणि अभिनंदनाचा वर्षावर होत आहे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या देखील ते बरेच पसंतीस उतरले. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचा आणि जनतेचा लाडका नेता संसदेत गेला असल्याची भावना शिरुरकरांची आहे.
अमोल कोल्हेंच्या या विजयावर कलाविश्वातूनही सध्या अभिमानाचे सूर उमटत असल्याचं पाहायला मिळतंय. दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेत्री अश्विनी महांगडे, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या कलाकारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे कलाकार मंडळी देखील अमोल कोल्हेंच्या विजयावर आनंदित असल्याचं पाहायला मिळतंय.
हेमंत ढोमेने काय म्हटलं?
हेमंत ढोमेने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, आमचे मित्र आणि आमच्या शिरूर मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार अमोल कोल्हे यांचा भव्य विजय...आपण आपला बुलंद आवाज संसदेत पुन्हा गाजवाल ही खात्री आहे. असेच काम करत रहा, मनःपुर्वक शुभेच्छा!
अश्विनी महांगडेनेही केलं अभिनंदन
अश्विनी महांगडेने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत अमोल कोल्हेंच्या बहिणीची भूमिका साकारली होती. त्यातच त्यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान शरद पवार गटातही प्रवेश केला आणि साताऱ्यात शशिकांत शिंदेंसाठी जाहीर सभाही घेतली. आता अमोल कोल्हेंच्या शिरुरमधील विजयानंतर त्यांच्यासाठी अभिनंदनपर पोस्टही केली आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की, अभिनंदन दादासाहेब, हॅशटॅग खासदार, असं कॅप्शन दिलं आहे.
अमोल कोल्हे शिरुर मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी
अमोल कोल्हे दे दुसऱ्यांदा शिरुर लोकसभेवर निवडून गेले आहेत. दरम्यान 2019 मध्ये देखील त्यांनी विजय मिळवला होता. पण राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित राहून अमोल कोल्हेंनी पवारांची साथ सोडली नाही. ते शरद पवारांसोबतच राहिले. त्यानंतर अजित पवारांकडून अमोल कोल्हे यांच्या विजयावर अनेकदा टीका टीप्पणी केली जात असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान यंदा अमोल कोल्हेंसमोर शिंदे गटाच्या शिवाजीराव आढराव पाटील यांचं आव्हान होतं. पण ते आव्हान मोडीत काढत विजयाचा गुलाल उधळला.
ही बातमी वाचा :
Shashank Ketkar : 'कृपया आम्हाला जगायला...', लोकसभेच्या निकालानंतर शशांक केतकरची पोस्ट चर्चेत