Amol Kolhe: लिखाणाचे पैसे घेत नाही, अभिनयाचेही पैसे सोडतोय; 'मी सावित्रीबाई.. ' मालिका सुरू ठेवण्यासाठी अमोल कोल्हेंची धडपड; पेमेंटचा एक रुपयाही ..; VIDEO व्हायरल
शिक्षणाचा हक्क पोहोचवण्याचा संघर्ष सुरू असतानाच मालिका बंद होण्याच्या चर्चा सुरू झाल्या.परिणामी केवळ व्यावसायिकच कारणे आहेत की राजकीय दबाव देखील आहे ,याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.

Amol Kolhe Viral Video: 'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले' हे स्टार प्रवाहवरील मालिका टीआरपीचे कारण देत बंद केली जाणार आहे. या मालिकेच्या जागी 'सुना येती घरा ' नावाची सिरीयल सुरू होणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर या मालिकेच्या चाहत्यांमध्ये प्रचंड रोष आहे. अनेकांनी वाहिनीच्या निर्मात्यांना ही मालिका बंद करू नका अशा विनवण्या केल्या आहेत. शिवाय, सोशल मीडियावर ऐतिहासिक मूल्य असणारी अत्यंत चांगली मालिका बंद करण्यावरून प्रेक्षकांनी स्टार प्रवाह वाहिनीवर टीकेची झोड उठवली आहे. ही मालिका स्टार प्रवाहवर अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळली गेली असली तरी ती दुसऱ्या मंचावर सुरू राहणार असल्याचं डॉ अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं होतं. त्यानंतर आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये डॉ अमोल कोल्हे सेटवरील सर्व कलाकार आणि तांत्रिक सहकाऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. मालिकेची गोष्ट सुरू राहावी यासाठी डॉ अमोल कोल्हे धडपडत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय.
ही मालिका सुरू ठेवण्यासाठी आर्थिक ताण आला तरी कुठल्याही कलाकाराच्या मानधनात कपात होऊ दिले जाणार नाही,अशी ग्वाही देतानाही ते दिसत आहेत. हे करत असताना स्वतःच्या मानधनात तडजोड करण्याची तयारी ही त्यांनी दाखवली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
अमोल कोल्हेंच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय ?
डॉअमोल कोल्हे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय. या व्हिडिओमध्ये ते मालिकेतील कलाकारांशी तसेच तांत्रिक सहकाऱ्यांशी बोलताना दिसत आहेत. ते सगळ्यांशी बोलताना दिसतात ' जे काही नुकसान असेल ती माझी जबाबदारी. म्हणजे मी लिखाणाचे पैसे घेत नाही. स्क्रीन प्ले चे पैसे घेत नाहीये. अभिनयाचे पैसेही मी सोडून देतो. त्यानंतर आपल्याला जेवढं पेलता येईल, तेवढ्याच पातळीवर आपण पेलू. कुठल्या मार्गाने ते मला आत्ता माहीत नाही पण कुठल्याही परिस्थितीत, आपण ही गोष्ट पूर्ण करणार आहोत. 100% पूर्ण करणार आहोत. त्यामुळे काही उद्या कोणी सांगितलं तर त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. मी आहे. आपल्याला गोष्ट पूर्ण करायचे आहे कारण माझ्यासाठी हे फक्त मालिका नाही. एक मिशन आहे. हे मिशन एका कृतज्ञतेच्या भावनेतून आपण जी गोष्ट करतोय, ती आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायची आहे. त्यामुळे आपण ती पूर्ण करणार आहोत. ही गोष्ट प्रत्येकाने डोक्यात क्लिअर ठेवा. त्यामुळे बाहेरून कोणी काही सांगेल, कोणी काही इतर चर्चा करतील, आई क्यू माहितीवर कोणी काहीतरी बोलेल. या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका.ही काळा दगडावरची रेघ आहे -ही गोष्ट पूर्ण होणार.गोष्ट पूर्ण होत असताना, स्पॉट बॉयपासून, मुख्य कलाकारापर्यंत कोणाच्याही पेमेंटमध्ये चॅनलने कितीही बजेट स्लॅश टाकला तरी, त्यांच्या पेमेंटमध्ये एका रपयाचाही फरक पडणार नाही. " असे ते म्हणाले.
View this post on Instagram
'मी सावित्रीबाई ..' मालिका का बंद होतेय ?
' मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले ' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक टप्प्यावर बंद करण्यात येणार आहे. स्टार प्रवाहवर दररोज 7.30 वाजता महाराष्ट्रातील हजारो लोक ही मालिका आवर्जून पाहतात. मालिकेच्या कथानकाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.इतकी लोकप्रियता असतानाही मालिका अचानक बंद करण्याची वेळ वाहिनीवर का आली ?असा प्रश्न उपस्थित होत असताना, मालिकेतील काही खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला मालिकेच्या टीआरपी चा मुद्दा पुढे करण्यात आला होता. पण, टीआरपी हा मुद्दा अर्धसत्य असल्याचं डॉ अमोल कोल्हे यांनी त्यांच्या एका पोस्टमध्येही म्हटलं होतं. आज-काल प्रेक्षक सगळ्या मालिका ओटीटीवर पाहतात. पण, टीआरपी हा केवळ संध्याकाळी प्रसारित केला जाणाऱ्या मालिकांचा मोजला जातो. मग, खरंच टीआरपीचे कारण आहे की, ही मालिका बंद करण्याचे षडयंत्र सुरू आहे? असा सवाल सातत्याने उपस्थित केला जात आहे.मालिकेतील प्रसंग संवाद आणि ऐतिहासिक संदर्भ यावर कायम चर्चा होत असते.पण मालिकाच बंद होणार अशी बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या अनेक संतप्त प्रतिक्रिया आल्या.
"सासु सुनेचे वाद, फूटकळ भांडणं, घरगुती लफडी, वर्षानुवर्ष पाणी घालून वाढवलेल्या मालिका चालतात, पण चांगला आशय असणारी मालिका कशी चालत नाही ? असा सवाल प्रेक्षक उपस्थित करत आहेत.विशेष म्हणजे मालिका अशा टप्प्यावर येऊन पोहोचली आहे, जिथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचा अत्यंत महत्त्वाचा अध्याय उलगडतोय. मुलींसाठी शाळा सुरू करण्याचा आणि शिक्षणाचा हक्क पोहोचवण्याचा संघर्ष सुरू असतानाच मालिका बंद होण्याच्या चर्चा सुरू झाल्या.परिणामी केवळ व्यावसायिकच कारणे आहेत की राजकीय दबाव देखील आहे ,याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.






















