Amjad Khan Death Anniversary : 'अरे ओ सांभा… कितने आदमी थे?' हा एक संवाद नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीतील इतिहासात अजरामर ठरलेला एक क्षण आहे. या संवादासोबत जे रूप पडद्यावर उभं राहिलं, त्यानं प्रेक्षकांमध्ये केवळ भीती निर्माण केली नाही, तर अशा एका कलाकाराचा जन्म झाला, ज्याची आठवण आजही सिनेप्रेमींना येते. या कलाकाराचं नाव आहे अमजद खान.
अमजद खान यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1940 रोजी पेशावरमध्ये म्हणजे ब्रिटीश भारतात झाला होता, आणि 27 जुलै 1992 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांचा अभिनय, त्यांचा आवाज, त्यांचे संवाद आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे . 'शोले', 'शतरंज के खिलाड़ी', 'मुकद्दर का सिकंदर', 'याराना' किंवा 'चमेली की शादी' ही सिनेमे आजही लोकं तेवढ्याच आवडीने पाहातात.
‘शोले’ मधील गब्बर सिंग सर्वात गाजलेली भूमिका
चित्रपटसृष्टीत खलनायकाच्या भूमिकेला अमजद खान यांनी खऱ्या अर्थाने यादगार बनवलं. ते यापूर्वी कोणालाही जमलेलं नव्हतं. त्यांचे वडील जयंत हे स्वतः एक प्रतिष्ठित अभिनेते होते, त्यामुळे अमजद खान यांना अभिनयाची बीजं लहानपणापासूनच घरात मिळाली. त्यांनी बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती
1975 मध्ये आलेल्या रमेश सिप्पी दिग्दर्शित 'शोले' या चित्रपटातील गब्बर सिंगच्या भूमिकेनं त्यांना घराघरात प्रसिद्ध केलं. या भूमिकेसाठी त्यांनी 'अभिशप्त चंबळ' ही कादंबरी वाचली होती, जेणेकरून खऱ्या डाकूंची मानसिकता समजून घेता यावी. गब्बर सिंह हे भारतीय सिनेमाातील पहिले असे खलनायक ठरले, ज्यांनी वाईटपणालाही एक ग्लॅमर आणि स्टाईल दिली. हे एक असा पात्र होतं, जे स्वतःला वाईट मानतं आणि त्याचा अभिमानही बाळगतो.
'शोले'मधील 'कितने आदमी थे?', 'जो डर गया समझो मर गया', 'तेरा क्या होगा कालिया' हे संवाद आजही लोकांच्या तोंडावर असतात. गब्बर सिंगचं पात्र इतकं लोकप्रिय झालं की अमजद खान यांना बिस्किट्ससारख्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्येही गब्बरच्याच रुपात दाखवलं गेलं. ही पहिलीच वेळ होती जेव्हा खलनायकाला ब्रँड अँबेसिडर म्हणून वापरलं गेलं.
अमजद खान यांची इच्छा होती की त्यांच्या वडिलांनी – जयंत यांनी त्यांचा ‘शोले’ मधील अभिनय पाहावा, पण नशिबाला हे मंजूर नव्हतं. ‘शोले’ 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झाली, आणि त्याआधी सुमारे दीड महिना म्हणजेच 2 जून 1975 रोजी त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे अमजद खान यांची ही इच्छा आयुष्यभर अपूर्णच राहिली. या दु:खासोबत त्यांनी अखेरपर्यंत आयुष्य घालवलं.
अमजद खान यांचे शेवटचे काही दिवस खूप वेदनादायक होते. एका अपघातामध्ये त्यांच्या 13 हाडांना गंभीर दुखापत झाली होती. त्या दुखापतीमुळे त्यांना व्हीलचेअरवर राहावं लागलं आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचं वजन झपाट्याने वाढलं. वजन इतकं वाढलं की ते कोमामध्ये गेले होते, पण नंतर परत आले. म्हटलं जातं की शेवटच्या क्षणांपर्यंतही अमजद खान प्रचंड वेदनेत होते. अपघातामुळे त्यांना व्हीलचेअरवरच राहावं लागलं. सतत त्या स्थितीत राहिल्यामुळे त्यांचं वजन वाढत गेलं आणि एक दिवस त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झालं. अमजद खान यांचं निधन 27 जुलै 1992 रोजी झालं.
इतर अविस्मरणीय भूमिका
अमजद खान फक्त ‘गब्बर’ नव्हते. त्यांच्या बहुआयामी अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना गंभीर, विनोदी आणि सकारात्मक भूमिकांतही प्रभावित केलं. सत्यजित रे यांच्या 'शतरंज के खिलाड़ी' (1977) या चित्रपटात नवाब वाजिद अली शाहच्या भूमिकेत त्यांनी दाखवलेली संयमित राजेशाही आणि सूक्ष्म अभिनय भारतीय समांतर सिनेमा साठी एक मौल्यवान देणगी ठरली.
‘मीरा’ (1979) मध्ये अकबरच्या भूमिकेत त्यांनी दाखवलेली धीरता ही ऐतिहासिक पात्र साकारण्यात एक आदर्श ठरली. ‘याराना’, ‘लावारिस’ अशा चित्रपटांत त्यांनी सकारात्मक व्यक्तिरेखा साकारल्या, तर 'उत्सव' (1984) मध्ये त्यांनी वात्स्यायनचा साकारण करताना बौद्धिक पातळीवरील अभिनयाचं दर्शन घडवलं. ‘कुर्बानी’, ‘लव स्टोरी’ आणि ‘चमेली की शादी’ सारख्या चित्रपटांत त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
वास्तविक आयुष्यातील अमजद खान
पडद्याच्या बाहेर अमजद खान एक बुद्धिमान, संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. कॉलेज जीवनातच त्यांनी नेतृत्वगुण दाखवले. पुढे ते 'अभिनेता संघटनेचे अध्यक्ष झाले आणि कलाकारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला. अनेक वेळा त्यांनी निर्माते आणि कलाकारांमध्ये मध्यस्थी करत वाद मिटवले. 1972 मध्ये त्यांनी शायला खानशी विवाह केला. शायला या प्रसिद्ध लेखक अख्तर उल इमान यांची कन्या होत्या. त्यांना तीन मुले – शादाब, अहलम आणि सिमाब आहेत. शादाब खान यांनी देखील अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु अमजद खान यांच्याइतकी ओळख कुणालाच मिळवता आली नाही.
1980 च्या दशकात त्यांनी ‘चोर पुलिस’ आणि ‘अमीर आदमी गरीब आदमी’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं, पण त्यांना अभिनयासारखी यशस्वी दिग्दर्शकीय कारकीर्द मिळाली नाही. 1976 मध्ये एका गंभीर अपघातानंतर त्यांची तब्येत बिघडली. डॉक्टरांनी दिलेल्या स्टेरॉईडमुळे त्यांचं वजन वाढत गेलं, जे नंतर त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरलं. 27 जुलै 1992 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांच्या अंत्ययात्रेला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. जेव्हा त्यांची अंत्ययात्रा बांद्राच्या रस्त्यांमधून गेली, तेव्हा असं वाटत होतं की संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी त्यांच्यासाठी नतमस्तक झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
निर्मिती सावंत यांचं मालिका विश्वात पुनरागमन? झी मराठीने व्हिडीओ शेअर केला, पण सस्पेन्स कायम ठेवला
