मुंबई : छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय रिॲलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'च्या 18 व्या पर्वात (KBC 18) 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. या शोमध्ये मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबला फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, अभिनेते राजकुमार राव आणि अभिनेत्री वामिका गब्बी सहभागी झाले होते.

Continues below advertisement

यावेळी उज्ज्वल निकम यांनी कसाबने न्यायालयात केलेला एक अजब दावा सांगताच अमिताभ बच्चन कमालीचे भडकले. "कसाबला तर तिथेच गाडायला हवे होते, तो जर माझ्या घरी आला असता तर मी त्याला गोळीच घातली असती," असा अत्यंत आक्रमक संताप बिग बींनी व्यक्त केला.

KBC 18 Episode : कसाबला फाशी देण्यासाठी 4 वर्षे का लागली?

केबीसीच्या मंचावर बोलताना अमिताभ बच्चन यांनी वकील उज्ज्वल निकम यांना विचारले की, "ज्या कसाबने निष्पाप लोकांचा बळी घेतला, त्याला फाशी देण्यासाठी 4 वर्षे का लागली? त्याला तर तिथेच गाडायला हवे होते."

Continues below advertisement

यावर उत्तर देताना उज्ज्वल निकम म्हणाले, "भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे, जे जगात सर्वोत्कृष्ट मानले जाते. आपल्या देशात कायद्याचे राज्य सर्वात वर आहे. कसाब जेव्हा कोर्टात आला तेव्हा तो पोलिसांची आणि न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने सुरुवातीला दावा केला की, मला 26 नोव्हेंबर रोजी नाही तर 6 नोव्हेंबर रोजी जुहू चौपाटीवरून पकडण्यात आले होते."

Kasab Claim On  Amitabh Bachchan : 'मी अमिताभ बच्चन यांना भेटायला आलो होतो'

उज्ज्वल निकम यांनी पुढे एक धक्कादायक प्रसंग सांगितला. "कसाबने कोर्टात अत्यंत चलाखीने सांगितले की, तो अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा चाहता आहे आणि तो त्यांना भेटण्यासाठीच मुंबईत आला होता."

कसाबचा हा दावा ऐकताच अमिताभ बच्चन यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. "नाही, नाही सर! तो जर माझ्या घरी आला असता तर तो तिथून जिवंत परत गेला नसता, मी त्याला तिथेच गोळी मारली असती," अशा शब्दांत बिग बींनी आपला राग व्यक्त केला.

Mumbai Attack Court Proceedings : 'न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न'

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पुढे स्पष्ट केले की, कसाब हा अत्यंत धूर्त आणि खोटा बोलणारा व्यक्ती होता. त्याने स्वतःला वाचवण्यासाठी अनेक हातखंडे वापरले. मी अल्पवयीन आहे, त्यामुळे माझ्यावर खटला चालवला जाऊ शकत नाही असा दावा त्याने केला. आपल्याला 'रॉ'ने (RAW) पकडल्याचे खोटे सांगून तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. माझा साथीदार इस्माईल याने गोळ्या झाडल्या, मी काहीही केले नाही असा बनाव त्याने रचला.

मात्र, जेव्हा सीटीसीव्ही (CCTV) फुटेज दाखवण्यात आले, ज्यामध्ये तो एका लहान मुलीवर गोळी झाडताना हसत होता, तेव्हा त्याचा क्रूर चेहरा समोर आला. आपल्या कायद्यात जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रत्येकाला बचावाची संधी दिली जाते, म्हणूनच या प्रक्रियेला 4 वर्षे लागली आणि अखेर कायद्याचा विजय झाला, असे उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले.

ही बातमी वाचा: