Sandhya Theatre Stampede Case: संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी मंगळवारी अल्लू अर्जुनची (Allu Arjun) चौकशी केली. अभिनेता त्याचे वडील अल्लू अरविंद आणि वकिलांसह 11 वाजण्याच्या सुमारास चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात पोहोचले. दुपारी 2.45 वाजता ते पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. सुमारे चार तास चाललेल्या चौकशीदरम्यान, पोलिसांनी अल्लू अर्जुनला बरेच प्रश्न विचारले. प्राधिकरणाने परवानगी दिली नाही याबाबत काही कल्पना होती का? असाही प्रश्न यावेळी अल्लू अर्जुनला विचारण्यात आला. 


अक्षांश यादव यांच्यासह पोलिसांच्या टीमने अल्लू अर्जनची चौकशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान अभिनेत्याला त्याच्या वैयक्तिक सुरक्षेबद्दलही विचारण्यात आले आणि बाऊन्सर्सनी त्याच्या चाहत्यांना कथितपणे धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. अल्लू अर्जुनचे वकील अशोक रेड्डी यांनी सांगितले की, अभिनेत्याने पोलिसांना पूर्ण सहकार्य केले आणि गरज पडल्यास ते त्यांना पुन्हा कॉल करतील.


चेंगराचेंगरीचा व्हिडिओ पाहून अल्लू अर्जुन झाला भावूक


गुलटे यांच्या म्हणण्यानुसार, अल्लू अर्जुन चौकशीदरम्यान भावूक झाला होता. 'पुष्पा 2' अभिनेत्याची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली आणि संध्या थिएटरमधील 'पुष्पा 2' विशेष कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीचे व्हिडिओ दाखवण्यात आले. व्हिडिओ पाहताना, श्रीतेज आणि रेवती जखमी झाल्याचे दृश्य पाहून अल्लू अर्जुन भावूक झाला.                                     


चौकशीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था


मंगळवारी अल्लू अर्जुनच्या हजेरीच्या पार्श्वभूमीवर चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही पोलिसांनी वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत.


नेमकं प्रकरण काय?


4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला, त्याला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला हैदराबाद पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी अटक केली होती. तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याच दिवशी अभिनेत्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता आणि 14 डिसेंबरला सकाळी त्याची तुरुंगातून सुटका झाली.


ही बातमी वाचा : 


कियाराला किस, आलियाशी फ्लर्ट, वरुण धवनने लाईव्ह शोमध्ये पातळी सोडली? खुद्द त्यानेच सांगितलं 'त्या' कृत्यामागचं सत्य!