Akshay Khanna Drishyam 3 exit: मनोरंजन विश्वात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. बॉलीवूडमध्ये सध्या चर्चा आहे ती धुरंधरची, आणि त्याहून अधिक चर्चा आहे ती अक्षय खन्नाची (akshay Khanna). 1000 कोटी कमवणाऱ्या ब्लॉकबस्टर ‘धुरंधर’च्या जबरदस्त यशाचा आनंद घेत असतानाच अभिनेता अक्षय खन्ना सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अक्षयने ‘दृश्यम 3’मधून अखेर एक्झिट घेतली आहे. अक्षय खन्नाच्या एक्झिटमुळे दृश्यम 3चे मेकर्स चांगलेच तापले आहेत. आता या प्रकरणावर चित्रपटाचे निर्माता कुमार मंगत पाठक (Mangat Pathak) यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. यात अक्षय खन्नावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. 

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूडमध्ये अक्षय खन्ना दृश्यम3 मध्ये दिसणार की नाही? यावरून चर्चा सुरू होती. धुरंधरच्या यशानंतर अक्षय खन्नाने आपल्या मानधनात वाढ केल्याचं सांगितलं जात होतं. तर दृश्यममधील अक्षयच्या लुक वरूनही त्याने काही अटी टाकल्या होत्या. त्याच्या वाढत्या मागण्यांमुळे मेकर आणि अक्षय यांच्यात मतभेद झाले. अखेर बोलण्या फिसकटल्या असून अक्षयने दृश्यम 3 मधून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय.  त्याच्या या निर्णयाने मेकर्स संतापले आहेत. अक्षयच्या डोक्यात यशाची हवा गेली आहे, असं म्हणत मेकर्सने अक्षय खन्नाला फटकारल्याचं दिसलं. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. 

"अक्षयपेक्षा चांगला अभिनेता मिळाला"  

बॉलीवूड हंगामाशी बोलताना दृश्यम 3 चे निर्माते कुमार मंगत पाठक म्हणाले, “‘दृश्यम’ हा एक मोठा ब्रँड आहे. एखादा अभिनेता असो वा नसो, त्याने फरक पडत नाही. आता अक्षय खन्नाच्या जागी जयदीप अहलावत आला आहे. देवाच्या कृपेने आम्हाला अक्षयपेक्षा चांगला अभिनेता मिळाला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यापेक्षा चांगला माणूसही मिळाला आहे. जयदीपच्या करिअरमधील सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक ‘आक्रोश’ (2010) मीच प्रोड्यूस केला होता. जयदीप हा अधिक चांगला अभिनेता आहे. त्याच्या कॅरेक्टर मध्ये थोडे बदल केले आहेत. आणि स्पष्ट सांगायचं तर आम्ही आता कधीच अक्षय खन्ना सोबत काम करणार नाही. कमिटमेंट घेऊन पैसे घ्या आणि पळ काढा, असं चालत नाही” असेही ते म्हणाले.

"यश डोक्यात गेलंय..." अक्षयच्या exitने निर्माते संतापले 

पुढे निर्माते कुमार मंगत पाठक म्हणाले, " अक्षय खन्नाच्या डोक्यात यशाची हवा गेली आहे. तो म्हणाला की, धुरंधर माझ्यामुळे चालतोय. मी त्याला समजावलं अनेक फॅक्टर्समुळे चित्रपट चालतोय. तसेच दृश्यम 3 मध्ये अजय देवगन मुख्य भूमिकेत आहे. विकी कौशलच्या 'छावा'मध्येही अक्षय लीड रोलमध्ये नव्हता. धुरंधरमध्येही तसंच आहे. तो रणवीर सिंहचा चित्रपट आहे. आजच्या काळात त्याने एकही सोलो चित्रपट केला तर तो भारतात 50 कोटी पण कमवू शकणार नाही. " 

"कधी कधी साईड रोल करणाऱ्यांना वाटतं की फिल्म त्यांच्या जोरावर चालली. धुरंदर हिट झाली आणि त्याच दिवशी अक्षयने मेसेज करून चित्रपट सोडतोय असं सांगितलं. फोनही उचलले नाहीत. आजूबाजूच्या चमच्यांनीच त्याच्या डोक्यात भरलं असणार. पण एखादी फिल्म हिट होण्यासाठी सगळ्यांचा हातभार लागलेला असतो. सेक्शन 375 नंतर मीच अक्षयला दृश्यम2  मध्ये घेतलं होतं. आम्ही चांगले मित्र होतो. तो दर महिन्याला ऑफिसला यायचा. पण अचानक यश डोक्यात गेलं." असं ते म्हणाले.

कायदेशीर कारवाईचा इशारा

निर्मात्यांनी अक्षय खन्नावर थेट आरोप करत सांगितलं की,“अक्षयच्या वागणुकीमुळे मला आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे मी कायदेशीर कारवाई करणार आहे. त्याला आधीच लीगल नोटीस पाठवली असून, त्यांचं उत्तर अजून यायचं आहे.” 16 डिसेंबर पासून शूटिंग सुरू झालं होतं. सेटही उभारले गेले होते, पण ते तोडावे लागले. त्यामुळे अक्षय खन्नाला लीगल नोटीस पाठवण्यात आली असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले. 

अक्षय खन्नाने चित्रपट का सोडला?

‘दृश्यम 3’साठी अक्षय खन्नाने 21 कोटी रुपयांची फी मागितली होती. मात्र, ही रक्कम चित्रपटाच्या बजेटच्या बाहेर जात असल्याचं निर्मात्यांचं म्हणणं होतं. दोन्ही बाजूंमध्ये एकमत न झाल्याने अक्षयने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. इतकंच नव्हे तर अक्षयने आपल्या लुकसाठी विग वापरण्याची अटही घातली होती. मात्र ‘दृश्यम 3’ हा थेट सिक्वेल असल्यामुळे कंटिन्युइटी बिघडेल, असं सांगत निर्मात्यांनी ही मागणी नाकारली. सुरुवातीला अक्षय मान्य झाला, पण नंतर त्याने अचानक चित्रपटाचा भाग न होण्याचा निर्णय कळवला.

‘दृश्यम 3’ कधी रिलीज होणार?

‘दृश्यम’ ही मूळ मल्याळम फ्रँचायझी असून, तिचं दिग्दर्शन जीतू जोसेफ यांनी केलं आहे. मल्याळम व्हर्जनमध्ये मोहनलाल आणि मीना मुख्य भूमिकेत आहेत. हिंदी व्हर्जनचं दिग्दर्शन अभिषेक पाठक करत असून, ‘दृश्यम 3’चा हिंदी चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षय खन्नाची एक्झिट आणि जयदीप अहलावतची एन्ट्री यामुळे ‘दृश्यम 3’भोवतीची उत्सुकता आता आणखीच वाढली आहे.